३०-१-१९४४ राज्यसत्तेची विभागणी सारखी झाल्या- शिवाय स्वराज्याला काय अर्थ - Page 488

४४८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

मी अस्पृश्य समाजाला राजकीय अधिकार मिळवून देण्याचे कार्य करीत

आहे. मला पुष्कळ लोक विचारतात की मी सगळ्या देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य

का करीत नाही ? पंडित जवाहरलाल नेहरूला देशाकरिता हजारो कॉलेज

विद्यार्थी मिळू शकतात. पण अस्पृश्यांच्या कार्याकरता पंडित नेहरूंचे कोणताही कॉलेज विद्यार्थी ऐकणार नाही. मग हे कार्य कोण करणार ? हे काम आपले

आहे. ते आपणच केले पाहिजे, देशाकरिता पुष्कळ लोक आहेत. अस्पृश्यांकरिता आमच्याशिवाय कोणी नाही. मी तर हेच काम करीत राहीन. ज्या कार्यात आठ कोटी पददलित, पिळल्या गेलेल्या लोकांचा उद्धार आहे, ते खरेखुरे स्वराज्य मिळविण्याचे कार्य आहे.

विद्यार्थ्यानी जे मला मानपत्र दिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला अस्पृश्य विद्यार्थ्याना एक प्रश्‍न विचारावासा वाटतो. तुम्ही डिग्री घेऊन नोकरी पत्करल्यावर आपल्या समाजाकरिता काय कराल ? तुम्ही आपल्या संसारातच गुरफटून न जाता ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाची परिस्थिती काय आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्या समाजाकरिता आपल्या नोकरीतला शक्य तेवढा पैसा दिला पाहिजे. मी हिंदुस्थान सरकारकडून दरवर्षी आपल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता तीन लाख रुपये मंजूर करविले आहे. त्याचा भरपूर उपयोग करा आणि माऱ्याच्या जागा पटकवा. याचा उपयोग तुम्ही केला | नाही आणि माऱ्याच्या जागा जर पटकावल्या नाही तर शेवटी तुम्हाला पश्चाताप | होइल. दुसरी एक गोष्ट, शिकलेल्या अस्पृश्य विद्यार्थ्यासाठी मला जी दिसते ती ही की, ते आपल्यातील मुलींबरोबर लग्न करीत नाहीत. मग दुसरे कोण करणार ? याचा आपण विचार केला पाहिजे.

आता मला आपणा सर्वांना सांगावेसे वाटते की आपण जो लढा सुरू केलेला आहे तो फार मोठा आहे, पवित्र आहे. आपल्या समाजाच्या उन्नतीशिवाय तो. आपण सोडता कामा नये.

e९6९