४५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मुसलमानांचेच हित साधू पाहतात. एवढेच नव्हे तर उलट जास्तीतजास्त, प्रसंग विशेषी, इतर अल्पसंख्यांकांचे हक्क हिरावून आपण अधिक सत्ता हस्तगत करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की हिंदूच काय पण मुसलमानसुद्धा आमच्या विरुद्ध आहेत.
काँग्रेसने व गांधीने आपणाला कसल्याही प्रकारचे हक्क मिळू नयेत, आपणाला स्वतंत्र अस्तित्त्व असू नये, आपण या देशात मानाने व सन्मानाने राहू नये व आपणाला राजकीय क्षेत्रातून कायमचे नष्ट करून आपल्या पायात हजारो वर्षांपासून चालत आलेल्या श्रृंखला अधिक घट्ट करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. आपण डोके वर काढू नये व सदैव त्यांचे गुलाम म्हणून राहावे, अशी त्यांची इच्छा आहे.
ब्रिटिश सरकार, हिंदू-मुसलमान यांना आम्ही सांगतो की देशाच्या सत्तेमध्ये आमचा वारसा पाहिजे. त्याकरिता आम्ही लढू मरू. आमचा अत्याचारावर विश्वास नाही व अत्याचाराची आम्ही पर्वा करीत नाही. ब्रिटिश सरकार, हिंदू, मुसलमान व इतर जमातींना आता कळले पाहिजे की ज्यात हिंदू, मुसलमान व अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधी असतील तेच खरे राष्ट्रीय सरकार म्हणता येईल. अस्पृश्य हे हिंदू समाजाचे एक घटक नाहीत, ते एक निराळे राष्ट्रच आहेत. स्वतःचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, चळवळ करण्यास व लढण्यास अस्पृश्य वर्ग तयार आहे.
आपली मागणी फार मोठी आहे. आपल्या मार्गात अनेक संकटे. आहेत. आपणाला शत्रु फार आहेत. त्याकरिता आपण आपली संघटना उभारली पाहिजे. आपण संघटन केले तर गांधी, जिना, सावरकर आपले हकक नाकारू शकणार नाहीत. सरकारकडे जाणे हे आपल्याला कमीपणाचे आहे. आपण आपले संघटन वाढवून आपल्या मागण्या मान्य करण्यास लावणे हे आपले आजचे कार्य आहे. आपली शक्ती वाढल्याशिवाय आपणास काही मिळणार नाही.
„ हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याबद्दल अस्पृश्यांना फारशी आस्था नाही, अशाप्रकारचा खोडसाळ, निंद्य व दुष्ट प्रचार काँग्रेस व राष्ट्रीय वर्तमानपत्रांकडून केला जातो. आपण राष्ट्रविरोधी, देशबुडवे आहोत अशाही प्रकारचे हल्ले आपणावर करण्यात येतात. अस्पृश्यांना माणुसकी पाहिजे, समता पाहिजे,