२२-९-१९४४ तर त्या स्वातंत्र्यासाठी मी केव्हाही लढावयास तयार आहे - Page 498

४५८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

१९३७ सालच्या निवडणुकांचा परिणाम काय झाला, पाहा. मतदानाच अधिकार अगदी व्यापक होता. निवडणुका अगदी जोरात लढविण्यात आणि मतेही अनिर्बंध देण्यात आली. शेवटी झाले काय ? आता त्याविषयी मला काही म्हणावयाचे नाही, पण काँग्रेसच्या ७ प्रांतात मी म्हटले तेच खरे ठरले. ते हे की, या देशात तुम्ही काहीही केले तरी शासनकर्ती जमात ही ब्राह्मण जातच ठरणार ! सात प्रांतात मुख्य प्रधान ब्राह्मण होते. मंत्रीमंडळात अर्धे लोक ब्राह्मणच होते. मी हे टीका म्हणून सांगत नाही. या प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टी आहेत. निवडणुकीवरून जर काही निश्‍चित झाले असेल तर ते हेच की, ह्या देशात शासनकर्ती जमात एकच आहे व तीच वर आली. प्रत्येक देशात स्वराज्य असावे का, हा प्रश्‍नच चुकीचा आहे. खरा प्रश्‍न हा की त्या देशातल्या शासनकर्त्या जमातीला राज्याधिकार देण्याइतका समंजसपणा त्या शासक जमातीत आहे काय ? या प्रश्नाच्या उत्तरावरच स्वराज्याचा हक्क अवलंबून आहे, हे आपण विसरत आहोत. एखाद्या शासनकर्त्या जमातीच्या हातात सत्ता द्यायची झालीच तर प्रश्‍न हा उपस्थित होतो की, त्या जमातीचा दृष्टिकोन काय आहे, तिला वाटते तरी काय ? जर तुमच्या शासनकर्त्या जमातीला असे वाटत असेल की, ठराविक विषमता असलीच पाहिजे, समतेवर तिचा विश्वास नसेल, तिला काही माणसांना माणसेही म्हणावे वाटत नसेल, त्यांना शिवू नये, शिक्षणाचा व मालमत्तेचा हक्क फक्त एकाच विशिष्ट वर्गाला आहे, दुसऱ्यांना नाही, दुसरे. गुलामच बनावे व गुलामीतच त्यांनी मरावे, असे त्या जमातीला वाटत असेल तर, मी विचारतो की राष्ट्रीय सरकार त्या जमातीच्या हातात आले तर ते राष्ट्रीय सरकार आजच्या मध्यवर्ती सरकारपेक्षा जास्त चांगले काम करणार आहे काय ?

मी राष्ट्रीय सरकारचा शत्रू नाही. माझा स्वराज्याला विरोध नाही अगर' स्वातंत्र्याच्याही मी विरूद्ध नाही. देशाला ज्याचे आश्वासन देण्यात येत आहे ते स्वातंत्र्य, शिक्षण आणि सुबत्ता माझ्याही वाट्याला येणार, अशी माझी खात्री पटली तर त्या स्वातंत्र्यासाठी, त्या राष्ट्रीय वृत्तीसाठी मी केव्हाही लढावयाला तयार आहे. पण जर हया सगळ्या लंब्याचवड्या तत्त्वज्ञानाचा परिणाम हाच होणार असेल की त्याचा व्याप फक्त एका शासनकर्त्या जमातीपुरताच राहाणार व हा राज्याधिकार त्या जमातीचा जोर वाढवून इतरांचे हक्क हिरावून घेण्यासाठीच होणार असेल तर आजच्या मध्यवर्ती सरकारवर जशी टीका होत आहे तशी टीका करण्यात काहीच अर्थ नाही. (टाळ्या).