१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
नसून आपल्या समाजाच्या हिताच्या बाजूने लढण्यासाठी जाणारा आहे हे लक्षात घ्या. तसेच नेहमीच्या व्यवहारात आपण पाहतो की, घर बांधताना दगडकामासाठी गवंडी व लाकूड कामासाठी सुतार आपण लावतो. कुठे एकदा रेल्वेचा पूल बांधावयाचा असल्यास इंजिनिअरची जरुरी असते. शाळा मास्तरला ते काम करता येत नाही. पण तुमच्या येथील उद्धव शिवशरण मास्तरने या जबाबदारीच्या जागेसाठी आपली निवड करावी म्हणून मला पत्र लिहिले. इंग्रजी न जाणणाऱ्या या मास्तराबद्दल मी मुग्ध राहिलो. तब्बल दोन महिने विचार केला आणि नंतर श्री. जिवाप्पा ऐदाळे यांचे नाव जाहीर केले. इतके होईपर्यंत श्री. मागाढे यांचे नाव मला कळविले नाही. मागाहून कळविले. पण याच्या बुडाशी काँग्रेसचा हात आहे व याबद्दल माझ्याकडे पुरावा आहे. बंधूंनो, कॉगेसला स्वराज्य पाहिजे आहे. आम्हालाही स्वराज्य पाहिजे. पण ते मिळविण्याचा काँग्रेसचा मार्ग जो कायदेभंग तो आम्हाला मान्य नाही. कायदेभंगाने स्वराज्याचा खुंटा हालवून बळकट केला आहे. काँग्रेसवाले तुम्हाला सांगतील की, आपल्या सर्वाच्या एकजुटीने इंग्रज सरकारला आपल्या देशातून. हाकून लावू या आणि स्वातंत्र्य मिळवू या. पण ढेकूण मारण्याची ज्यांना छाती नाही, ते सर्वतोपरी सुदृढ, सुसज्ज अशा इंग्रज सरकारला कसे हाकून लावणार, अथवा समजा उद्या इंग्रज सरकार इंग्लडला निघून गेले, तर आम्हाला धार्मिक, आर्थिक, सामाजिक अवनतीच्या खड्ड्यात कुजत ठेवणारे खोत, जमीनदार हे कुठे परदेशी जाणार आहेत काय? आणि कांग्रेस तर शेठ सावकार, जमीनदार, भांडवलदार लोकांची संस्था म्हणून अशा लोकांच्या कसल्याच भूलथापा तुम्ही ऐकू नका.
बंधूंनो, तुमच्या मतांची किमत मीठ मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे, हे विसरू नका. भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटक्याच्या हातात बक्य्याने सुरी दिल्यासारखे होईल. श्री. जिवणा ऐदाळे हे माझ्या पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना ध्येय आहे, त्यांना तत्त्व आहे. त्यांची आणि तुमच्या भावी हितानहिताची सर्व जबाबदारी माझ्या शिरावर आहे. म्हणून श्री. जिवाणा ऐदाळे यांनाच आपली तिन्ही मते देऊन निवडून आणा. दुसरे उमेदवार कोणी माझे शत्रू नाहीत. पण ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या लोकांची जबाबदारी मी घेणार नाही. आजपर्यत तुम्हाला कोणी तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा, नात्या-गोत्याचा अभिमान धरा म्हणून सांगितले असेल किंवा पुढे सांगतील, पण असा अभिमान धरावयाचा झाल्यास शेवटी तुम्हाला आपल्या गावचा व घराचासुद्धा अभिमान धरावा लागेल आणि असे घरोघरी उमेदवार उभे राहतील तर तुमच्या भावी कल्याणाचा सत्यानाश होईल याचा विचार करा.