४६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितली होती. इंद्रियांना
कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हणजे कुणी अधिकारी
व्यक्तीने सांगितलेली वस्तूच सत्य, असे नाही. उलट ब्राह्मणांचे म्हणणे असे
की, जे वेदाप्रमाणे तेच सत्य (हास्य) बौद्ध क्रांतिकारक होते आणि ब्राह्मण
प्रतिगामी. सध्या आपण प्रतिगामी लोकांच्या वर्चस्वाखाली आहोत. वेद
वाचल्यानंतर मला मोठे आश्चर्यच वाटले, त्यात विदूषकी बडबडीखेरीज दुसरे
काही नाही. (प्रचंड हास्य व टाळ्या) अशा ह्या पुस्तकांनाच प्रमाणग्रंथ
मानण्याचा आग्रह ब्राह्मणांसारखे हुशार लोक का धरतात ? अथर्ववेदात तर
निव्वळ ' जादुई मंत्र ' आहेत ! (हास्य व टाळ्या).
जर इस्लाम धमनि ह्या देशात पाऊल टाकले नसते तर आणखी फार काळ
हा ब्राह्मण-बौद्धातला लढा चालला असता. जगाच्या इतिहासात स्वातंत्र्य,
समता व बंधुत्वाचा आदेश देणारा बुद्ध हाच पहिला मनुष्य निघेल. तो आदेश
नष्ट झाला आहे. त्याचीच आज हिंदू समाजाला सर्वात जास्त जरूरी
आहे. तो आदेश नष्ट झाला कारण क्रांतीविरूद्ध प्रतिक्रांतीने विजय
मिळविला.
पुष्कळ लोकांना भगवद्गीता हा फार मोठा धार्मिक ग्रंथ वाटतो. मोठ्या
खेदाने मला म्हणावे लागते की तसे वाटण्यासारखे मला तरी त्या पुस्तकात काही
आढळले नाही. याउलट त्या ग्रंथाने बराच अनर्थ केला आहे. ज्या बुद्धीच्या
कसोटीला उतरू शकणार नाहीत, अशा गोष्टींना तात्त्विक आधार देण्याचा प्रयत्न
त्यात केला आहे.
शेवटी राजकारण, समाज, राज्य शासन, धर्म व बुद्धिवादात ज्या क्रांतीची बुद्धाने मुहूर्तमेढ रोवली ती पुढे निष्फळ ठरली. धर्म व राजकारण यांना एकत्र जुंपून, चातुर्वर्ण्य ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्त्वज्ञान आहे. असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृती लिहिण्यात आली.
आपल्या सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे. प्रत्येक देशात राजकीय पुढाऱ्याची कसोटी पाहिली जाते. पण गांधींकडे पाहा. त्यांना तशी कसोटीच कुणी लावत नाही. ते म्हणतील ते खरे. दोन वर्षापूर्वी गांधी म्हणाले पाकिस्तान हे पाप आहे. सर्व काँग्रेसवाल्यांनी त्यांची री ओढली. आज गांधी म्हणतात, पाकिस्तान पाप नाही, मुसलमान मागतील