२४-९-१९४४ सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही - Page 504

२१०
सत्तेवर असूनही ब्राह्मणेतर पक्षाला

ब्राह्मण्य नष्ट करता आले नाही

दक्षिण भारतात १९२०-३६ या काळात ब्राह्मणेतरांचा पक्ष, जस्टिस पार्टी, फार प्रबळ होता. तो १९३७ च्या नंतर डबघाईस आला. त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न जून १९४४ पासून सुरू झाले. यासाठी मद्रास प्रांतात बऱ्याच सभा झाल्या. अशा तऱ्हेची एक मोठी सभा २४-२५ सप्टेंबर १९४४ ला सालेम या शहरात भरविण्याचे जाहीर झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या चळवळीची माहिती मिळाली तेव्हा त्यांना ब्राह्मणेतर पुढाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून या विषयाची संपूर्ण माहिती मिळविण्याची इच्छा झाली. त्यांनी सदर चळवळीचे प्रमुख श्री. ई. व्ही. रामस्वामी नायकर यांना भेटण्यास या म्हणून आमंत्रण पाठविले, तेव्हा श्री. नायकर बाबासाहेबांना भेटण्यासाठी मद्रासला शनिवार, दिनांक २३ सप्टेंबर १९४४ ला आले. चेट्टीनाड हाऊस, अड्यार येथे दोघांनी दोन तास चर्चा केली. ब्राह्मणेतर पक्षाच्या सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला आपला पाठिंबा आहे व पुढेही राहील, असे बाबासाहेबांनी श्री. नायकर यांना आश्वासन दिले. 'करूर' येथे भरणाऱ्या ब्राह्मणेतर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी श्री. नायकर, मद्रास येथून दिनांक २३ सप्टेंबरच्या रात्री रेल्वेने गेले.

रविवार, दिनांक २४ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता मद्रास शहरातील अस्पृश्य. महिलांतफे बाबासाहेबांना रायपेट्टा येथील 'वुडलँडस' या भव्य इमारतीत चहापार्टी देण्यात आली. स्त्रियांनी चळवळीत भाग घ्यावा व आपल्या समाजाच्या उन्नतीच्या कार्याला हातभार लावावा, अशा अर्थाचे भाषण त्यांनी तेथे केले. आपल्या समाजातील शिकलेल्या लोकांना आपल्या जातीचा नामनिर्देश करण्याची भीती वाटते ही नामुष्कीची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.

'दी संडे ऑब्झर्व्हर', मद्रास या पत्राचे संपादक, श्री. पी. सुब्रह्मनियम मुदलियार, यांनी बाबासाहेबांना कोन्नेमर हॉटेलमध्ये दुपारचे जेवण दिले. जेवणानंतर हॉटेलच्या ग्रीन रुममध्ये आमंत्रित पाहुणे (सरकारी अधिकारी व इतर) गप्पा मारण्यास बसले, त्यावेळी यजमानाने बाबासाहेबांना ब्राह्मणेतर चळवळीसंबंधी मार्गदर्शक विचार प्रदर्शित करण्याची विनंती केली. तेव्हा बाबासाहेबांनी आपले विचार प्रदर्शित केले. ते म्हणाले,

डॉ. भी. रा. आंबेडकर चरित्र : ले. चां. भ. खैरमोडे, खंड ९, पृ ३८१-३८३.