४६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
चैनीत दिवस काढू लागले. ब्राह्मणांना शिव्याशाप देणारे ब्राह्मणेतर ब्राह्मणांप्रमाणे गंध लावणे, पूजा करणे, पोशाख करणे वगैरे ब्राह्मणी आचार विचारांचा अवलंब करून राहू लागले. यागुळे ब्राह्मण्य नष्ट करण्याचे जे ब्राह्मणेतर पक्षाचे धोरण होते ते सांदीकोपच्यात पडून राहिले आणि ब्राह्मण्य तसेच जिवंत राहिले. ब्राह्मणेतर पक्षाला ब्राह्मणांपासून आपण अगदी निराळे आहोत, त्यांचे व आपले तत्त्वज्ञान यात जमीन अस्मानाचे अंतर आहे, याची पूर्ण कल्पना आली नाही व त्याप्रमाणे वर्तन करण्याचे ध्येय त्यांना साध्य करता आले नाही. ब्राह्मण हे पहिल्या दर्जाचे ब्राह्मण होत व आपण दुसऱ्या दर्जाचे ब्राह्मण आहोत हीच कल्पना ब्राह्मणेतरांच्या वागणुकीवरून सिद्ध झालेली आहे. ब्राह्मणेतर पक्षाचे पुढारी हेही विद्वान व तर्कशुद्ध विचार करणारे उच्च दजचि नव्हते. त्यांच्यात पक्षाचे धोरण व्यापक करून पक्षाला लोकशाही स्थापन करण्यासाठी राबविता आले नाही. पुढारी कसे असावेत ? स्पष्ट धोरण आखणारे व त्या धोरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जीवाचे रान करणारे. गांधी अगर जिनांसारखे पुढारी नसावेत. गांधी आज एक मत देतील तर उद्या त्याच्या उलट देतील. अशी उदाहरणे अनेक देता येतील. पाकिस्तानाबद्दल त्यांनी आतापर्यंत अनेक परस्पर विरोधी मते प्रकट केली आहेत. जिना तर हुकूमशहा आहेत. ते लीगमधील कार्यकारी मंडळ स्वतः तयार करतात. लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींना ते मान्यता देत नाहीत. गांधी व जिना यांना त्यांचे अनुयायी पुढारीपणापासून च्यूत का करीत नाहीत ? कारण तसे झाले तर काँग्रेस व लीग या पक्षात बजबजपुरी माजेल, हे ते ओळखतात. कारण या दोन पुढाऱ्यांमुळेच त्यांच्या पक्षात संघटना टिकून राहिलेली आहे. ब्राह्मणेतर पक्षांच्या पुढाऱ्यांनाही दूर केले तर त्या पक्षाची : संघटना होणार नाही. कारण ही संघटना मुळी विस्कळीत आहे. ती सिमेंटप्रमाणे घट्ट नाही. म्हणूनच १९३७ च्या निवडणुकीत त्या पक्षाला ब्राह्मणेतर मतदार बहुसंख्य असताही हार खावी लागली.
७ ७ ७