४६८ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बसू शकतील, असे त्यांना वाटत होते, त्यावेळी ते एकदा म्हणाले की काही झाले तरी डॉ. आंबेडकरांना कोठल्याही आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घ्यावयाला मिळणार नाही, अशी काळजी हिंदी जनतेने घेतली पाहिजे. त्यांच्यासारख्या वयोवृद्ध व पूज्य माणसाच्या तोंडी ही भाषा ऐकून मला अंमळ आश्चर्य वाटले. माझे सार्वजनिक आयुष्य नामदार शास्त्रींच्या तुलनेने लहानच आहे आणि तेवढ्यात त्यांच्या इतकी कीर्तीही मी संपादन केली नसेल. परंतु या लहानशा सार्वजनिक आयुष्यातही मी असे कोणते दुष्कृत्य केले की ज्यामुळे मला एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बसलेला बघून हिंदी जनतेला शरमेने मान खाली घालण्याची पाळी यावी ? . याबद्दल मी बरेच आत्मसंशोधन करून पाहिले. मी काही येथे शिव्या देण्यासाठी उभा नाही. नाहीतर मी नामदार शास्त्रींना ब्रिटिश सरकारच्या मांडीवरचे कुत्रे सहज म्हणू शकलो असतो. सबंध आयुष्य त्यांनी ब्रिटिश सरकारच्या मांडीवर बसून घालविले आहे आणि देशात किंवा देशाबाहेर जर त्यांनी काही कुप्रसिद्धी आणि मोठेपणा मिळविला असेल तर केवळ ब्रिटिश सरकारने त्यांना शोभेसाठी पुढे करण्याची कृपादृष्टी ठेवली म्हणूनच होय. शास्त्रींची वटवट म्हणजे कुजलेल्या मढ्यावर चालविलेली एका म्हाताऱ्या कावळ्याची कावकाव आहे असे मी म्हणू इच्छित नाही.
बहुतेक काँग्रेसवाले म्हणत तरी काय असतात? हेच की अस्पृश्य वर्ग देशहिताच्या आड येतो ! श्री. गांधी, नामदार शास्त्री, सर तेजबहादूर सप्रू व. हिंदी राजकारणात प्रथम पंक्तीचा मान असलेल्या अनेक पुढाऱ्यांच्या बरोबर मी बसलो आहे. राष्ट्रवाद्यांकडून ज्याची आपण अपेक्षा करू नये अशा गोष्टी करताना त्यांना मी पाहिलेले आहे आणि माझी खात्री आहे, नुसतीच खात्री नाही, तर या गोष्टीचा मला अभिमान वाटतो, की ज्या ज्या वेळी एखादा सार्वजनिक प्रश्न गोलमेज परिषदेत चर्चेस आला त्या त्या वेळी त्या देशभक्त म्हणून समजल्या जाणाऱ्या लोकांपेक्षा माझे वर्तन कितीतरी पटीने चांगले व राष्ट्रीय बाण्याचे होते. (टाळया)
येथे जमलेल्या बहुतेक लोकांना गांधींनी गोलमेज परिषदेत काय केले ते माहीत नसेल. आम्ही सर्वानी तेथे श्रेष्ठ कामगिरी बजावली, अशीच तुमची समजूत असेल. हे खरे आहे का ? श्री. गांधींनी काय केले ? १९३१ साली जेव्हा गांधी गोलमेज परिषदेत गेले त्यावेळी काँग्रेसची त्यांना आज्ञा होती कौ संपूर्ण स्वातंत्र्याचीच त्यांनी मागणी करावी, काहीही कमी स्वीकारू नये. हिंदुस्थानातले