४७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
गोष्टी मी तुम्हाला सांगू शकेन. आम्ही सर्व फेडरेशनच्या अगदी विरुद्ध होतो. मी सुरुवातीपासून लढविलेला एक महत्त्वाचा मुद्दा हा होता की ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानातील राजकारणाची संस्थानातील राजकारणाशी भेसळ करू नये. या दोघांना निरनिराळे होऊन आता जवळ जवळ १५० वर्षे झाली. अर्थात आम्ही एकच लोक आहोत. आमचे भवितव्यही एक असणार यात शंका नाही, तरी शेवटी ही गोष्ट राहतेच की १५० वर्षे आम्ही वेगवेगळ्या मार्गानी चाललो आहोत. आम्हाला मिळालेले राजकीय शिक्षण वेगवेगळे आहे.
माझे आग्रहाचे सांगणे होते की ब्रिटिश सरकारने हिंदुस्थानला राष्ट्रस्वातंत्र्या- कडे स्वतःच्याच विशिष्ट मार्गाने जाऊ द्यावे. त्यांच्या पासंडीला हिंदी संस्थानिकांना जोडून त्यांचे भवितव्य गुंतागुंतीचे करू नये. नामदार शास्त्री त्याच मताचे होते किंवा या ' कटात ' माझ्या बरोबर सामील होते म्हणा ! आम्ही तिघेजणच ह्याप्रमाणे ब्रिटिश हिंदुस्थानला ' हृदयाशी ' बाळगून होतो. ना. शास्त्री, सर चिंतामणी व मी.. माझ्यासारख्या ' पोरापेक्षा ' नामदार शास्त्रीसारख्या कीर्तीमान मनुष्याकडे लोक जास्त आदराने बघतील म्हणून आम्ही त्यांना आमच्या वतीने बोलण्यास उभे केले. परिषदेपुढे ते बोलले. त्याच्या आदल्या दिवशी मी व चिंतामणी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांचे मत त्या वेळीही तसेच निश्चित असल्याचे आम्हास आढळले. तीन वाजता किंग जेम्स पॅलेसमध्ये नामदारसाहेब बोलणार होते तेथे आम्ही गेलो, ते काय बोलले असतील असे तुम्हाला वाटते ? माझे व सर चिंतामणींचे हृदय चांगले मजबूत होते म्हणून बरे, नाहीतर त्याचवेळी त्या धक्क्याने आम्ही ठार झालो असतो. श्री. शास्त्री यांनी सांगितले की ते फेडरेशनच्या बाजूने होते ! आणि त्यांचे मला सांगणे होते. की, मी दुराग्रह करून सर्व योजनेचा विचकाच करीत आहे म्हणून मी गप्प ` बसावे. जर गांधी प्रामाणिक असते आणि हिंदी संस्थानातील जनतेबद्दल त्यांना खरी कळकळ असती तर संस्थानिकांच्या जुलूमापासून त्यांची सुटका व्होवी ह्या तत्त्वानुसार ते वागले असते. संस्थांनी प्रजेचे प्रतिनिधी जनतेने निवडले पाहिजे असा त्यांनी सर्वांच्या आधी आग्रह धरला असता. उलट गांधींनी सांगितले की, संस्थानिकांनी प्रतिनिधींची पसंती करण्यास त्यांची मान्यता आहे ! एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे ती ही की गांधींना राजकारण फार थोडे कळते. हे काही मी त्यांची निंदा करण्याच्या दृष्टीने म्हणत नाही किंवा टाळ्या मिळविण्याच्या हेतूनेही म्हणत नाही. परंतु ही सत्य गोष्ट आहे. मी पहिल्या गोलमेज परिषदेला हजर होतो, गांधी नव्हते. मला त्यातील पुष्कळ खाचखळगे माहीत होते आणि गांधींनी बोलण्यापूर्वी त्या सर्व बऱ्यावाईट, खोट्या नाट्या गोष्टी त्यांना कळाव्यात म्हणजे त्यांनी काय बोलावे काय नाही ते कळेल, अशी मला कळकळ वाटत होती. दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी गांधी असताना फेडरल