शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा ४७१
स्ट्रक्चर कमिटीवर मी होतो. अर्थात अस्पृश्यांचा प्रतिनिधी असल्यामुळे मला अध्यक्षस्थानी असलेल्या लॉर्ड चँसेलर शेजारी जागा मिळण्याची आशा
नव्हती. मला शेवटी कोठेतरी बसविण्यात आले होते. पहिल्या दिवशी गांधी आले तेव्हाच सभेचा विषय चर्चेला निघाला होता. आधीच गांधींना राजकीय ज्ञान कमी व त्यातच ते पहिल्या परिषदेला हजर नव्हते या दोन गोष्टींमुळे मला बरीच काळजी वाटत होती. सर्वाआधीच बोलण्याची संधी मिळाली तर सर्व परिस्थिती मी उघडकीस आणीन आणि गांधींना त्याची चांगली जाणीव करून
देईन, अशी मला उत्कंठा होती.
तेव्हा, थोडा ताप आल्याचे निमित्त करून मी लॉर्ड चँसेलर साहेबांकडून प्रथम बोलण्याची परवानगी मागितली. त्यांनी गांधींना काही विरोध असल्याचे विचारले. गांधींनीही उदारपणा दाखवून नाही म्हटले. जवळ जवळ दीड तास मी बोललो. विलायतेत याहून अधिक मी कधीच बोललो नसेन. भाषण झाल्यानंतर आधी ताप आल्याची जी सबब सांगितली होती ती खरी भासविण्यासाठी मला निघून जाणे भाग होते. गांधी नंतर काय बोलले, हे कळून येण्यासाठी सबंध रात्र आतुरतेने वाट पाहणारा सबंध लंडनमध्ये मीच एकटा त्यावेळी असेन. बरोबर मध्यरात्रीला परिषदेचा रिपोर्ट माझ्या हाती पडला. घाई घाईने मी ते पाकीट फोडले आणि गांधींचे पहिलेच वाक्य माझ्या नजरेस पडले
' माझ्या मनाला डॉ. आंबेडकरांचे म्हणणे पटते पण बुद्धीला पटत नाही!" माझ्या भाषणात मी जे काही सुचविले होते त्याच्या अगदी उलट ते बोलले होते. मला
अतिशय संताप आला आणि सकाळी जरी नव्हता तरी मात्र मला रात्री थोडा ताप
आला. दुसर्या दिवशी सकाळी मी परिषदेस गेलो. गांधी व इतर सर्व तेथे
होतेच. सभा सुरु होताच मी लॉर्ड चँसेलरकडे गांधींना काही प्रश्न विचारण्याची
परवानगी मागितली, माझे व गांधींचे भांडण असण्याचे मूळ कारण हेच होय.
मी गांधींना तीन प्रश्न विचारले. माझा पहिला प्रश्न हा होता की संस्थानी
प्रजेचे प्रतिनिधी संस्थानिकांनीच पसंत करावे, असे म्हणण्यात काँग्रेसने
त्यांना काही आज्ञा केली होती काय ? काँग्रेसने कधी यावर चर्चा केली होती
काय ? काँग्रेसने त्यांना त्या बाबतीत बोलण्यास काही अधिकार दिला होता
काय? दुसरा प्रश्न निवडणुकीविषयी होता. कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला निवडणुका
अप्रत्यक्ष व्हाव्या अशी इच्छा होती. आमचा सर्वाचा त्याला विरोध होता. परंतु
गांधींनी ते मान्य केले. मी. गांधींना प्रश्न केला की याच तत्त्वाचा पुरस्कार
केल्याबद्दल काँग्रेसने मिसेस अँनी बेझंटचे होमरूल बिल फेटाळले होते, ही