२४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा - Page 512

४७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

गोष्ट खरी आहे की नाही ? तिसरा प्रश्‍न आता काही माझ्या ध्यानात

नाही, अध्यक्षानी गांधींना काही उत्तर द्यावयाचे आहे का म्हणून विचारले. गांधींनी

उत्तर देण्यास नकार दिला. जर हिंदुस्थानला बुडविण्याचे पाप कोणाच्या हातून

घडत असेल तर ते माझ्या हातून नाही, अस्पृश्यवर्गाच्याही हातून नाही, ते पाप

गांधी, शास्त्री व अशाच दुसऱ्या लोकांच्या हातून घडलेले आहे.

आयर्लडची परिस्थिती हिंदुंनी आठवावी. १९१६ साली त्या देशाची एकजूट

करण्याचे शेवटचे प्रयत्न झाले. दक्षिण आयर्लडमधील कॅथालिकांतर्फे रेडमंड

व आयर्लडतर्फ सर एडवर्ड कार्सन यांची बोलणी चालली होती. ज्यावेळी

रेडमंडने उत्तर आयर्लडमधील प्रॉटेस्टन्ट पंथाच्या लोकांसाठी खास हक्क देऊ

केले, तेव्हा कार्सनने उत्तर दिले, 'जळोत ते तुमचे खास हक्क. आम्हाला तुमच्या हुकमतीखाली मुळी कसेही राहावयाचे नाही !' आम्ही असे कधी म्हटले आहे काय ? आम्हाला तसे म्हणायला सबळ कारणे आणि हक्क असूनही आम्ही तसे म्हटलेले नाही. त्याहून कितीतरी नम्रतेने आम्ही बोलत आहोत. हिंदू महासभेच्या अध्यक्षाप्रमाणे आम्ही अजून म्हटलेले नाही की तुमची लोकशाहीची बोलणी म्हणजे स्वतःची सुलतानशाही झाकण्यासाठी दिलेल्या थापा आहेत. आम्ही म्हटले तुम्हाला स्वराज्य पाहिजे, घ्या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. फक्त एक लहानशी न्याय्य अट आहे. आम्हाला आमच्या हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी खास हक्क द्या. कार्सनच्या भूमिकेपेक्षा आमची भूमिका कितीतरी उच्च पातळीवर आहे.

आमची ही भूमिका देशप्रेमाची नाही, उदात्त नाही, उदार अंत:करणाची नाही असे शास्त्री किंवा गांधी किंवा कोणीही काँग्रेस पुढारी म्हणू शकेल काय ? दोन हजार वर्षांचा ब्राह्मणांचा केवढा भयंकर जुलूम आम्ही विसरावयास तयार आहोत ! व ते एका आशेवर की आम्हाला हे खास हक्क मिळाले तर देशातील इतर विशाल अंतःकरणाच्या माणसांच्या मदतीने आम्ही आमच्या समाजाला व राष्ट्राला खऱ्या माणुसकीचे व राष्ट्रत्वाचे हक्क प्राप्त करून देऊ, सर्व राजकारणात ह्याहून अधिक उदार, अधिक उदात्त आणि थोर भावना कोणी दाखवू शकेल काय ? म्हणून मी माझ्या हिंदू बांधवांना सांगतो की आतातरी तुमची मनोवृत्ती बदलून टाका आणि आम्ही जो स्वार्थत्याग करीत आहोत, भविष्यकाळाच्या आश्वासनावर विसंबून आम्ही आज जो धोका पत्करण्यास तयार होत आहोत त्याचा नीट विचार करा. आपण सामोपचाराने हा प्रश्‍न सोडवू एकी करण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी मी तयार आहे. परंतु दुर्दैवाने अजून मला ह्या बाबतीत हिंदू समाजाचा अनुभव बरा नाही.