२४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा - Page 513

शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा ४७३

जेव्हा जेव्हा आम्ही आमचे डोके वर केले तेव्हा तेव्हा त्यांनी हशावरी गोष्ट घालविली. १९३२ साली प्रथम अस्पृश्यांचा प्रश्‍न वर आला आणि मुसलमानांच्या जोडीचे स्थान त्यांना मिळाले. तेव्हा मतदान कमिटीने सबंध देशात फिरून प्रत्येक प्रांतातील अस्पृश्यांची संख्या शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मला सर्वत्र हाच अनुभव आला की सगळे हिंदू, मग ते जुने सनातनी असोत की स्वतःला व्यापक दृष्टीचे म्हणविणारे असोत, सर्व एका सुरात सांगावयाचे की अस्पृश्य नावाची काही चिजच नाही. संयुक्तप्रांत, बिहार, पंजाब सगळीकडे हीच स्थिती. असे का ? कारण अगदी उघड आहे. आमच्या हिंदू बांधवांना कळले होते की, सरकार अस्पृश्यांचे वेगळे प्रतिनिधी कायदे मंडळात घेणार आहे आणि त्या प्रतिनिधींची संख्या अस्पृश्यांच्या एकंदर संख्येवर अवलंबून राहाणार ' आहे. सरकारचा निर्णय बदलणे त्यांना शक्य नव्हते. म्हणून अस्पृश्य नावाचा समाजच अस्तित्त्वात नाही, असा धादांत खोटा कांगावा त्यांनी सुरू केला होता. असा नीच डाव १९३२ साली हिंदू खेळत होते. आज ते निराळाच डाव खेळत आहेत.

गांधी व व्हाईसरॉय यांचा पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला तुम्हास माहीतच आहे. त्यामध्ये १५ जुलै १९४४ चे पत्र फार महत्त्वाचे आहे. त्यात व्हाईसरॉयांनी म्हटले आहे की, युद्धाअंती हिंदुस्थानला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश सरकार तयार आहे. परंतु एका अटीवर. ती अशी की, जी घटना त्यावेळी अंमलात येईल ती हिंदुस्थानातील राष्ट्रीय जीवनातील सर्व प्रमुख घटकांना संमत असली पाहिजे. हे प्रमुख घटक कोणते, हेही व्हाइसरॉयांनी सांगितले आहे. आपल्या सुदैवाने आणि हिंदुबांधवांच्या दुदैवाने त्यात अस्पृश्यांचाही एक प्रमुख घटक म्हणून त्यांनी उल्लेख केला आहे.

या बाबतीत काही वर्तमानपत्रे ओरड करीत आहेत को, व्हाइसराॉयचे हे विधान नवीन आहे आणि क्रिप्सने ब्रिटिश सरकारतर्फे जी योजना मांडली होती तीत असे काही म्हटले नव्हते. या गोष्टींची मला चीड येते. असा खोटा आणि दुष्ट विचार त्यांनी का करावा कळत नाही. हिंदू वर्तमानपत्रकारांनी आणि संपादकांनी आपण ज्याविषयी बोलतो त्याची माहिती तरी नीट घ्यावी आणि सर्व कळल्यानंतर त्यांना जी भ्याड टीका करावयाची ती करावी.

अस्पृश्यांचा मतदार संघ निराळा असावा अशी शिफारस सायमन कमिशनने किती आग्रहाने केली, ते सांगण्याची गरज नाही. कोणाची असे म्हणण्याची छाती आहे काय की, अस्पृश्य समाज हा या देशातील एक स्वतंत्र व महत्त्वाचा