२४-९-१९४४ शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा - Page 515

शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट आणि आकांक्षा ४७५

केला. बरेच दिवस प्रयत्न फसल्यानंतर कोठलाही प्रामाणिक मनुष्य करणार नाही अशी गोष्ट त्यांनी केली. मुसलमानांकडे जाऊन जिनांना त्यांनी त्यांच्या १४ अटी देण्याचे कबूल केले. पण ते एका अटीवर को, त्यांनी ह्या 'नालायक अस्पृश्य कुतरड्या' बरोबर बोलणी करू नयेत. ह्याचा माझ्याकडे लेखी पुरावा आहे. गोलमेज परिषदेत गांधी व लीग यांच्यात झालेला एक लेखी मसुदा माझ्याकडे आहे. यावेळी तरी तसे होणार नाही, अशी मला आशा आहे.

आपले उद्दिष्ट काय आहे ते नीट समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आमचे उद्दिष्ट व आकांक्षा आहे हे तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील की, ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत ते काही लहानसहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतींसाठी आपला लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ती कृतीत उतरवण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ निवेदनाचा किंवा शब्दांचा काही उपयोग होणार नाही. कदाचित गांधी त्याला हवेत उडवून लावतील.

गांधींना व सरकारलादेखील दोघांनाही दाखवावे लागेल की ह्यावेळी आम्ही मनाचा निश्चय करून हे सांगत आहोत व सरकारलाही आपल्याला निश्‍चितपणे उत्तर द्यावे लागेल. आपण आता काहीही टाळाटाळ चालू देणार नाही. सरकारने एकदा जे वचन दिले आहे ते सरकार पाळील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण सरकारच्या किंवा इतर कोणाच्याही सदिच्छेवर अवलंबून राहाण्यात काही अर्थ नाही. आपण स्वतःवरच विश्वास ठेवला पाहिजे. आपण आपली जोरदार संघटना केली पाहिजे. दुसऱ्या सर्व अडचणी आपण बाजूस

सारल्या पाहिजे.

ह्या शहरातील अस्पृश्यांमध्ये मला अत्यंत मोठा उत्साह दिसून येत आहे. तो

कदाचित माझ्या आगमनामुळे असेल, परंतु स्थानिक वृत्तीने स्थानिक कार्यक्रम

करून आपली शक्ती वाढणार नाही. आपण सर्व एका राजकीय संघटनेमध्ये

जमलो पाहिजे व जगाला दाखवून दिले पाहिजे की, अखिल भारतीय

शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनमध्येच अखिल अस्पृश्य समाजाची एकजूट झालेली

आहे. (प्रचंड टाळ्या)