२४-१-१९३७ ज्यांना पक्ष नाही, ध्येय नाही, तत्त्व नाही अशा अधांतरी लोंबकळणाऱ्या उमेद- वारांना निवडून देऊ नका - Page 52

१४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

चांदीच्या गडव्याला बांधलेला दोर ओढून बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढले. लोकांनी प्रसाद म्हणून पाणी मागताच बाबासाहेब विनोदाने 'दक्षिणा काढा' असे म्हणाले व सर्वत्र हशा पिकला. अखेर बाबासाहेबांना लोकांना पाण्याचा प्रसाद द्यावा लागला. लोकांनी सदर विहिरीचे नाव आंबेडकर बावडी असे ठेविले व बाबासाहेब सोलापूरास रवाना झाले.

सोलापुरास श्री. देशपांडे वकील यांचे बंगल्यावर जेवण झाल्यानंतर बाबासाहेब बार्शीकडे गेले. वाटेत बैराग, पानगाव वगैरे ठिकाणी हारतुरे स्वीकारून तीनच्या सुमारास बार्शी येथील श्री. भगवंत मीलजवळ पोचले.

बार्शीची सभा

येथे ८-९ हजार लोकांचा समुदाय व सरमाळेकर, रा. नामदेवराव वासकर, माणकेश्वर, कासारवाडीकर यांच्या बॅडच्या ताफ्यासह सामोरा आला होता. तेथून मिरवणुकीने बाबासाहेब पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी, काझी मशीद, जैन मंदीर, भाजी मार्केट या रस्त्याने म्युनिसिपल दवाखान्याजवळ उभारलेल्या भव्य मंडपात येऊन पोचले.

प्रथम बार्शीचे तरुण-सुशिक्षित महार पुढारी श्री. मनोहर दादा बोकेफोडे यांनी स्वागतपर, सुंदर विचारपरिप्लुत असे भाषण केले. नंतर बाबासाहेबांनी थोडयाफार फरकाने सोलापूर प्रमाणेच अर्धा तास भाषण केले व श्री. ऐदाळे यास मते देण्यास सांगितले. यानंतर निरनिराळ्या संस्थांतर्फे हारतुरे होऊन सभा विसित झाली व बाबासाहेब कुर्डुवाडीकडे रवाना झाले.

| कुर्डुवाडीची सभा

येथे जिल्हा बोर्डाचे मेंबर श्री. शंकरराव रिकीबे, कोंडीराम कांबळे, निंगापा कुमार ऐदाळे, सांगोळकर, बंदसोडे, खंडेराव मिस्त्री, भाऊसाहेब कांबळे, केसकर वगैरे मंडळीनी 'श्री. हिरालाल थिएटर' शुंगारून सर्व प्रकारची जय्यत तयारी ठेविली होती. श्री. बाळकृष्ण ऐदाळे यांचे स्वागतपर विस्तृत भाषण झाल्यावर बाबासाहेबांनी सोलापूरप्रमाणे अर्धा तास भाषण केले व ऐदाळे यासच मते देण्याची कबुली लोकांनी दिल्यानंतर हारतुरे होऊन बाबासाहेब टेभुर्णीकडे रवाना झाले.

टेभुर्णीची सभा

येथे महार आणि मातंग समाजांनी आपापल्या चावडीसमोर शोभिवंत मंडप उभारून पान-सुपारीची तयारी केली होती. तेथे १०-१० मिनिटे बाबासाहेबांनी इलेक्शनसंबंधी मागील प्रमाणेच भाषण करून पान-सुपारी व हार-तुरे स्वीकारून ते करमाळ्यास रवाना झाले.