२१४
पक्षांच्या व जातीच्या हार्दिक सहकार्यानेच
| राजकीय पेच सुटतील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुरूवारी २८ सप्टेंबर १९४४ ला संध्याकाळी राजमहेंद्री येथे आले. बरोबर श्री. पां. ना. राजभोज, जनरल सेक्रेटरी फेडरेशन, आणि श्री. व्ही. रामकृष्णन, ए. सी. एम. लेबर डिपार्टमेंट, हे होते. बाबासाहेब आंबेडकरांना म्युनिसीपालिटीतर्फे म्युझियम हॉलमध्ये मानपत्र देण्यात आले. म्युनिसीपल चेअरमन श्री. सोमिना कामेश्वरराव आणि म्युनिसीपल कमिश्नर श्री. के. व्यंकटाद्रि चौधरी यांनी त्यांचे स्वागत केले. बाबासाहेबांचे अद्वितीय विद्यार्जन. त्यांनी केलेली अस्पृश्यातील जागृती आणि त्यांच्यासाठी व कामगारांसाठी त्यांनी केलेली कामे, याबद्दलचा मानपत्रात उल्लेख करून म्युनिसीपालिटीने लोकोपयुक्त व अस्पृश्यांना हितकारक अशी कोणती कामे केली, याबद्दलची माहिती देण्यात आली होती. सरकारकडे काही मागण्याही केलेल्या
होत्या.
लोकोपयोगी. कामे केल्याबद्दल बाबासाहेबांनी म्युनिसीपालिटीचे अभिनंदन केले. अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय केल्याबद्दल त्यांनी तिचे आभार मानले. भारतातील ही एकच म्युनिसीपालिटी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करीत आहे, इतर म्युनिसीपालिट्यांनी हा धडा गिरवावा, असे उद्गार काढले.
गांधी-जीना वाटाघाटी फिसकटल्याबद्दल त्यांनी दु:ख प्रदर्शित केले. या वाटाघाटी, मुळी एकांगीच होत्या. त्यात अल्पसंख्यांक जातींना स्थान नव्हते. राजकीय प्रश्न सोडविण्याची ही खरी रीत नव्हे. सर्वांनी एकत्र बसावे, घटना तयार करावी, या घटनेवर सह्या कराव्या आणि त्या घटनेप्रमाणे आम्हाला भारतात राजवट करू द्या अशी मागणी करण्याकरिता शिष्टमंडळ लंडनला पाठवावे. ते मंडळ एकट्या गांधींचे असले तरी चालेल. पण त्यांनी भारताची मागणी व्यवस्थितपणे मांडली पाहिजे. मी हे असे म्हणतो याचे कारण गांधीनी आतापर्यंत भारतात विलक्षण राजकीय जागृती निर्माण केली, पण तिचा फायदा देश स्वातंत्र्यासाठी कसा करून घ्यावा, याची दूरदृष्टी गांघीजींजवळ नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र : ले. चां. भ. खैरमोडे, खंड ९, पृ. ३९४-९५.