२१५
बुद्धाच्या वेदांवरील हल्ल्यामुळेच शूद्रांचा
सेवाधर्म जावून ते राज्यकर्ते झाले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २९ नोव्हेंबर १९४४ रोजी सायंकाळी अखिल
भारतीय दलित फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी, श्री. पी. एन. राजभोज यांनी पुणे
येथे चहापार्टी दिली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात
म्हणाले,
आज भाषण करण्याची माझी इच्छा नव्हती. एकाने मी सर तेजबहादूर सप्रू यांच्या योजनेवर अभिप्राय द्यावा अशी सूचना केली. परंतु त्या बाबतीत येथे बोलण्याची माझी इच्छा नाही. मी मद्रासमध्ये गीतेसंबंधी जे बोललो त्याबद्दल पुण्यातील ब्राह्मणांनी नापसंती व्यक्त केली आहे. त्याला उत्तर देणे उचित वाटते. माझे म्हणणे समजून घेण्यासाठी एखादी जाहीर सभा पुण्यात घेतली गेली असती तर तेथे मी माझी बाजू मांडली असती. पण तशी संधी न मिळाल्यामुळे या समारंभ प्रसंगीच मी आपले म्हणणे मांडतो.
वेद हे ईश्वरनिर्मित आहेत, अपौरुष आहेत, त्यांची आज्ञा मानावी, असे सांगण्यात येते. पण त्याला इतिहासात कोठे पुरावा नाही. ब्राह्मणांखेरीज कोणीच वेदाला प्राधान्य दिलेले नाही व आपला धर्मग्रंथ म्हणून कधीच मानलेले नाही. वेदाला प्रमाण मानणे ही ब्राह्मणांनी मागाहून आणलेली पद्धती, 'थीअरी' आहे. याचा पुरावा आश्वलायन गृह्य सूत्रातून भरपूर मिळतो. त्यावेळी ब्राह्मणही वेदाला प्रमाण मानीत नव्हते, याचा स्पष्ट उल्लेख आहे. सामाजिक मूल्ये निर्माण करण्यापूर्वी जनता पंचायतीचा निर्णय ग्राह्य मानीत असत. त्यावेळी वेदाला चौथे किंवा पाचवे स्थान असे. शबर स्वामींनी जनमेजयाची सूत्रे घेऊन त्यावर भाष्य केले आहे. त्यात पूर्वपक्ष व उत्तरपक्ष मांडले आहेत. पूर्वपक्षात वेदासंबंधी उल्लेख आला असून वेदविरोधकांची बाजू मांडलेली आहे. शबर स्वामींनी ब्राह्मण वेद मानीत नव्हते, असेच म्हटले असून वेद निर्मिती म्हणजे मूखचि व वेड्यांचे कार्य होय असा दावा मांडला आहे. बुद्धांनी वेद प्रमाणभूत कधीच मानले नाहीत. वेदप्रणित धर्मास बुद्धधर्माने धक्का दिला. हा बुद्धधर्म शूद्रांचा होता व तो वेदप्रामाण्य कधीच मानीत नव्हता. |
जनता : ९ डिसेंबर १९४४.