सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होईल ४८७
प्रतीचे असे दुसरे एखादे कार्य आहे, असे मला मुळीच वाटत नाही. मी ज्या समाजामध्ये जन्मलो आहे, त्या समाजाच्या उद्धारासाठी झटणे हे माझे कर्तव्य आहे. आधी मला माझ्या समाजाचे ऋण फेडावयाचे आहे, त्यानंतर देशाचे. माझे हे जीवितकार्य उदात्त असेच आहे, याबद्दल मला मुळीच संदेह नाही.
स्पृश्य हिंदुंच्या विषयी असे म्हणता येईल की देशातील लक्षावधीच नव्हे तर कोट्यावधी रंजलेल्या, गांजलेल्या आणि दडपल्या गेलेल्या लोकांचे रक्त शोषण करून त्यांच्या श्रमावर मजा मारण्याचा ऐतखाऊ हिंदू लोकांचा कावा आहे. अशा भांडवलशाही खुशालचेंडूंच्या हाती देशाचे स्वातंत्र्य जाणार असल
तर त्याचा आपल्याला व देशातील जनतेला काहीच उपयोग होणार
नाही. हिंदुंच्या हाती देशाची सत्ता गेली तर ते अस्पृश्य समाजाला आणि रंजल्या
गांजलेल्या जनतेला अधिकच दडपण्याचा प्रयत्न करतील, याबद्दल मला मुळीच
शंका नाही. म्हणून आपण एव्हापासूनच दक्षता बाळगणे अगत्याचे आहे. या
वेळी आपण आपली संघटना मजबूत केली नाही तर अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये
निग्रो लोकांची जी अवस्था आहे तीच गत आपली झाल्याशिवाय राहणार नाही,
याबद्दल आपणापैकी प्रत्येकाने खातरजमा बाळगली पाहिजे. अमेरिकेसारख्या
सुधारलेल्या देशात या विसाव्या शतकात देखील निग्रो लोकांच्या हक्कांना स्थान
नाही. कारण त्यांच्यात एकी नाही, संघटना नाही म्हणून त्यांची अशी दुर्दशा
आहे. निग्रो लोकांप्रमाणे आपली स्थिती होऊ देता कामा नये. यावर उपाय
एकच की आपल्यातील झाडून साऱ्या जमातींनी, लहान थोरांनी, स्त्रीपुरुषांनी
आपल्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनच्या एकाच झेंड्याखाली संघटित होणे. आपण
अशी अभेद्य संघटना निर्माण केली तर आपल्या हक्कांचे रक्षण करून हिंदू लोकांचे
डाव आपण सहज हाणून पाडू शकू.
सध्याच्या युगात वर्तमानपत्राचे अत्यंत महत्त्व आहे. आपापल्या पक्षाचा प्रचार
करण्याकरिता इतर पक्ष हजारो रुपये खर्च करून वर्तमानपत्रे
चालवितात. जनतेपुढे आपली राजकीय आणि नैतिक बाजू मांडण्यासाठी व
त्याचप्रमाणे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या कार्याची माहिती देण्यासाठी
वर्तमानपत्रांची आवश्यकता आहे. आपल्या चळवळीचा दृष्टिकोन मांडण्याकरिता
आज आपणास प्रांतोप्रांती अनेक वर्तमानपत्रे पाहिजे आहेत. त्या दृष्टीने
अस्पृश्य समाजाच्या वतीने येथे सुरू होणारे हे ' पीपल्स हेराल्ड ' साप्ताहिक
आपली बाजू निर्भीडपणे मांडण्याचे कार्य उत्तम प्रकारे बजावील असा मला पूर्ण
भरवसा आहे. 'पीपल्स हेराल्ड' ची उत्तरोत्तर प्रगती होवो, असे मी इच्छितो. :