२१८
आम्ही आमच्या कर्तृत्वाने आणि हिंमतीने
देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू
“ अखिल भारतीय दलित फेडरेशनचे तिसरे अधिवेशन मुंबई येथे ता. ५ व ६
मे १९४५ रोजी अत्यंतं उत्साहाने पार पडले.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आज प्रचंड घडामोडी चालू असताना
हिंदुस्थानातील आठ कोटी अस्पृश्य जनतेला कोणते प्रश्न सर्वात जास्त
जिव्हाळ्याचे वाटतात व त्या प्रश्नांच्या बाबतीत तिचे काय म्हणणे आहे हे
समजण्याच्या दृष्टीने हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे होते
अस्पृश्य समाज आपल्या देशातील जनतेचा सर्वात गांजला जाणारा विभाग
आहे. गुलामगिरी, पिळवणूक; विटंबना या समाजाइतकी दुसऱ्या कोणाच्याही
वाट्याला आलेली नाही. असा हा समाज आज जागृत झाला आहे. दलित
फेडरेशनची प्रचंड संघटना उभारून त्याने ताकद पैदा केली आहे व 'शासनकर्ती
जमात' बनण्याचे ध्येय पुढे ठेवून त्याकडे वेगाने प्रगती करण्याचा त्याने निर्धार
केला आहे, हे या अधिवेशनात स्पष्टपणे दिसून आले
या अधिवेशनाला हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतातून अस्पृश्य समाजाचे
सुमारे १,००० प्रतिनिधी आले होते. याखेरीज बाहेरून आलेल्या प्रेक्षकांचा
भरणाही फार मोठा होता. एकट्या नागपूरहूनच सुमारे ५०० लोक आले होते
व त्यापैकी ५० हून अधिक स्त्रिया होत्या. गुजरात मधून २०० लोक
आले होते
परळ येथील 'नरे पार्क' चे विस्तीर्ण मैदान अधिवेशनाच्या वेळी लोकसमुदायाने भरगच्च भरले होते. प्रेक्षकांसाठी कमीतकमी १ रुपयाची तिकीटे ठेवली असताही ५० हजाराहून अंधिक लोक अधिवेशनाला आले होते व त्यापैकी सुमारे ५ हजार स्त्रिया होत्या. डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणात सभेला जमलेल्या लोकांची संख्या एक लाख ते दीड लाख असल्याचा उल्लेख केला मुंबईत अस्पृश्य समाजाची वस्ती सुमारे दोन-अडीच लाख आहे व यापैकी निम्याहून अधिक कुटुंबातून प्रत्येकी एकतरी माणूस सभेला आला होता असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही. तान्ही मुले व म्हातारीकोतारी माणसे यासह सबंध कुटुबच्या कुटुंब सभेला आल्याची शेकडो उदाहरणे नजरेस पडत होती.