६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 530

४९० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

चित्र असलेला दलित फेडरेशनचा लाल झेंडा उंचावरून फडकू लागताच समता सैनिक दलाच्या तीन हजार स्वयंसेवकांनी त्याला खडी सलामी दिली व सर्व प्रेक्षकांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला.

खुले अधिवेशन

शनिवार, ता. ५ रोजी संध्याकाळी फेडरेशनचे खुले अधिवेशन सुरू झाले. भोवताली पडदे लावलेल्या मैदानात दुपारपासूनच लोक जमण्यास सुरवात झाली होती. दरवाज्याशी ऑफिसवर तिकिटे विकत घेणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याच्या वेळी मैदानात ४० हजाराहून अधिक लोक होते.

मैदानाच्या एका बाजूला विस्तीर्ण व्यासपीठे तयार केले होते व त्याच्या मध्यभागी शोभिवंत कमानीवर गौतम बुद्धाचे शांत-गंभीर चित्र काढलेले होते. हिंदुस्थानातील सामाजिक विषमतेवर हल्ला चढविण्याऱ्या पहिल्या ' देशव्यापी चळवळीचा संस्थापक म्हणून गौतम बुद्धाला अस्पृश्य समाज फार मोठा मान देत असतो. |

व्यासपीठावर निरनिराळ्या प्रांतातले व निरनिराळ्या प्रकारचा पोषाख घातलेले प्रमुख प्रतिनिधी बसले होते. प्रांतिक कायदेमंडळात व म्युनिसीपालिट्या वगैरे संस्थात निवडून आलेले अस्पृश्यांचे प्रतिनिधी तेथे दिसत होते, तसेच . खेड्यापाड्यात किवा शहरात अत्यंत निकृष्टावस्थेत राहून स्वार्थत्यागपूर्वक आपल्या बांधवांची सेवा करणारे इतर तरुण व वृद्ध कार्यकर्तेही तेथे नजरेस पडत

होते.

प्रथम मराठी, हिंदुस्थानी, तामिळ वगैरे निरनिराळया भाषात स्वागतपर गाणी | झाली. ही गाणी म्हणण्यासाठी वृद्ध, तरुण, स्त्रिया, पुरुष वगैरेमध्ये जणू काय चढाओढच लागली होती. वेळेच्या अभावी कैक उत्साही कवींना गाणे म्हणण्याची संधी मिळाली नाही. अनेक युगांच्या गुलामगिरीच्या यातनांचे खोल पडसाद या गाण्यातून उमटत होते. त्याचवेळी संघटनेमुळे उत्पन्न झालेला अमर्याद आत्मविश्वास, ध्येयाची निश्चितता व ते साध्य करण्याचा लढाऊ निर्धार | या गाण्यात स्पष्टपणे व्यक्त होत होता. अस्पृश्य जनतेच्या एकजुटीचे व सामर्थ्याचे प्रतीक या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित फेडरेशन यावरील अढळ भक्ती व्यक्त करताना गाणाराप्रमाणेच असंख्य श्रोत्यांचेही हृदय अभिमानाने उचंबळून येत होते.