६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 533

आम्ही आमच्या कर्तृत्वाने . . . . जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू ४९३

प्रतिनिधीशी मुलाखत

___ परिषदेसाठी आलेल्या प्रतिनिधींची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असता त्यांच्याकडून बरीच उद्बोधक माहिती मिळाली. अहमदाबादहून आलेल्या प्रतिनिधींनी सांगितले की, श्री. गुलजारीलाल नंदांच्या मजूर महाजनचे लोक स्पिनिंग खात्यातील अस्पृश्य गिरणी कामगारांना दमदाटी करून मजूर महाजनचे सभासद करून घेतात व कोणी न ऐकल्यास मालकाकडून त्याला कामावरून काढून टाकावयास लावतात. राजकीय बाबतीत अहमदाबादच्या अस्पृश्य कामगारांचा दलित फेडरेशनलाच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

यवतमाळ येथील एका प्रतिनिधीने संयुक्त मतदारसंघामुळे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाबाबत अशी माहिती सांगितली की, त्या जिल्ह्यातील एका म्युनिसीपालिटीमध्ये अस्पृश्यांच्या राखीव जागेसाठी हिंदू व मुसलमानांनी एका अस्पृश्येतर इसमाच्या अस्पृश्य रखेलीला निवडून दिले ! अस्पृश्य समाजाला मुद्दाम चिडविण्याचे हे उदाहरण अपवादात्मक नाही, असे त्याने आपल्या अनुभवाच्या आधारे सांगितले.

खेड्यातील जुलूम

वऱ्हाडातील दुसऱ्या एका प्रतिनिधीने खेड्यात अस्पृश्यांना भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांची माहिती सांगितली. तेथे सनदी नोकर म्हणून काम करणाऱ्या अस्पृश्य कामगाराला गाव-कोतवाल म्हणतात. पूर्वी त्याला जमीन किंवा बलुते नेमून दिले असे, पण त्याबरोबर त्याने भीक मागितली पाहिजे अशी स्पृश्य समाजाने रूढी पाडून ठेवली होती. ही रूढी पाळण्याचे अस्पृश्यांनी नाकारल्यामुळे त्यांचे बलुते बंद करण्यात आले आहे व त्यांना दरमहा ८ रुपये पगार व ४ रुपये महागाईभत्ता देण्यात येतो. तसेच त्यांना कामावरून कादून टाकण्याचा अधिकार गावच्या पोलीस पाटलाला असल्यामुळे त्यांच्या या तुटपुंज्या पगारातून बराचसा भाग पोलीस पाटील स्वतः उपटतो व शिवाय त्यांना आपल्या शेतात व घरी मोफत काम करण्यास सक्ती करतो.

गिरणी कामगारांच्या तक्रारी

नागपूर येथील गिरणीत काम करणाऱ्या काही प्रतिनिधींनी रुईकरांविषयी आपले तीव्र असमाधान व्यक्त केले वं फारच कमी पगार व महागाइभत्ता मिळत असल्याचे सांगितले. नागपूरात शेकडा ७० गिरणी कामगार अस्पृश्य समाजातले आहेत व त्यांच्यापैकी बरेचजण युनियनचे सभासद आहेत.