६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 534

४९४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दलित समाजाची एकजूट

अस्पृश्य समाजातील बहुसंख्यांक भाग स्वतःची जमीन नसलेल्या शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा व गिरण्या-कारखान्यात मोलमजुरी करणाऱ्या कामगारांचा

आहे. त्यांच्या विशिष्ट मागण्यांचे प्रतिबिंब दलित फेडरेशनच्या ठरावात व. कार्यात दिवसेंदिवस जास्त प्रमाणात दिसून येईल यात शंका नाही. तथापि, राजकीय मागण्यांच्या बाबतीत सबंध अस्पृश्य समाज आज दलित फेडरेशनच्या. पाठिशी उभा आहे हे स्पष्ट आहे व ही संघटना अधिक बळकट करण्यात व इतर राजकीय संस्थांशी तिचे सहकार्य घडवून आणण्यात अस्पृश्य समाजाचेच नव्हे तर देशातील समग्र जनतेचे हित आहे याची फेडरेशनच्या या अधिवेशनावरून कोणाचीही खात्री पटेल.“ *

'' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण

' रविवार ता. ६ मे १९४५ रोजी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनच्या तिसऱ्या अधिवेशनानिमित्त उभारलेल्या विस्तीर्णशा साध्वी रमाबाई आंबेडकर नगरात अखिल भारतीय महिला परिषदेचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे प्रचंड अशा जनसमुदायापुढे ऐतिहासिक महत्त्वाचे भाषण झाले. डॉ. बाबासाहेबांच्या भाषणाचे वेळी सुमारे १,५०,००० (दीडलाख) लोक हजर होते. लोकांपुढे येवून त्यांना दर्शन देण्याबद्दल स्वागत मंडळाकडून डॉ. बाबासाहेबांना विनंती करण्यात आली, ती त्यांनी मान्य केली. श्री. मडकेबुवा यांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार घातल्यावर, स्टेजच्या जरा पुढे वक्त्यांसाठी खास उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब ७ वा. ५ भि. नी भाषण करण्यास उभे राहाताच ' आंबेडकर झिंदाबाद ' च्या प्रचंड जयघोषांनी आणि टाळ्यांच्या कडकडाटांनी सर्व वातावरण दुमदुमून गेले. या जनसमुदायात सबंध हिंदुस्थानातील अस्पृश्य लोक उपस्थित होते. या सर्व लोकांची आपल्या एकमेव पुढाऱ्यावर किती अनन्यभक्ती आहे हे कट्टर विरोधकांनाही मान्य करावे लागले. या अफाट अस्पृश्य जनसागरास स्वाभिमानाचा, स्फूर्ती व चैतन्याचा जणू पूर आला होता !

डॉ. बाबासाहेबांचे भाषण सुरू होताच सर्व लोक चित्रासारखे तटस्थ होवून ऐकू लागले. ' सुई पडली तर तिचा आवाज ऐकू येईल', इतकी निवांत शांतता पसरली.

* लोकयुद्ध : १३ मे १९४५.