६-५-१९४५ आम्ही आमच्या कर्तृत्वाचे आणि हिमतीने देशाकरिता जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू - Page 536

४९६ डॉ. बाबासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे

राज्यघटनेसंबंधी जो रिपोर्ट लिहिला तो वाचण्यासारखा आहे. अस्पृश्यांनी तर

तो जरूर वाचला पाहिजे. १५० पानांच्या या रिपोटांत फक्त तीनच वाक्यात

अस्पृश्यांचा निकाल लावला आहे. नेहरू रिपोटनि या तीन वाक्यात म्हटले आहे

की अस्पृश्यांचा प्रश्‍न राजकीय नसून धार्मिक आहे. फक्त शीख, खिश्चन

यांच्या बाबतीत काही प्रश्‍न सोडवावे लागतील. यावरून काय

दिसते ? १९२८ साली काँग्रेस ७ कोटी अस्पृश्यांना शून्य समजत होती. दोन

वर्षानंतर राऊंड टेबल परिषद भरली. तेथे अस्पृश्य लोकांनी काही जरी नाही

तरी शून्याचे दहा केले. एकावर पूज्य वाढविले. (टाळ्या) पण गांधींनी दहाचे.

पुन्हा शून्य करण्याचा घाट घातला. पण त्यांचे साधले नाही. (हंशा)

गेल्या वर्षात सर्वाच्या दिलजमाईकरिता ' सप्रू समिती ' जन्माला आली. त्या

समितीने नवे बंधारण कसे असावे याबाबत एक खर्डा तयार केला आहे. सप्रू

समितीच्या मते १० चा आकडा ५० वर नेला पाहिजे. याचा अर्थ असा की,

अस्पृश्यांची उन्नती ० वरून ५० वर आली आहे. (प्रचंड टाळ्या)

काँग्रेस, रॉय ग्रूप व कम्युनिस्ट हे आपल्याशी सलगी दाखवितात, ते आपल्या चळवळीचा विचका करण्यासाठी । कम्युनिस्टांचे संदेशपर पत्र याच वाईट हेतूने आले होते. काल ते पत्र वाचण्याचे अर्ध्यावर बंद केले गेले.

१९२० सालापासून तो आजतागायत काँग्रेसशी आमचे भांडण आहे. ते मिटेल की नाही हे सांगता येत नाही. गेल्या अनेक वर्षात आमचा काँग्रेसशी घनघोर लढा चालला असताना हे कम्युनिस्ट व रॉयिस्ट-दुरूस्त निमूटपणे पाहात असत व आमची टवाळी करीत असत. आम्हाला राजकीय दृष्ट्या संरक्षक अशी बंधने असली पाहिजेत. या बाबतीत या लोकांनी गेल्या २० वर्षात काही केले नाही. आताच त्यांना आपुलकी का वाटू लागली आहे ?

रॉयवादी म्हणतात, अस्पृश्यांनी आमच्यात का येऊ नये? कम्युनिस्ट म्हणतात आमच्यात का येऊ नये ? काँग्रेसच्या बाया महारवाड्यात जाऊन आमच्या बायांच्या डोक्यातील उवा काढतात, त्यांची लुगडी धुतात, पोरांना आंघोळी घालतात. नुकतेच काँग्रेसच्या बायांनी पुण्याच्या मांग वाड्यात जाऊन आमच्या मुलांना दूध पाजले. पण दुसऱ्याच दिवशी त्या मुलांना हगवण लागली, अशी बातमी उठली (हंशा) ! ही आपुलकी व स्नेहभाव हे लोक का दाखवितात हे तुम्ही सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे.