आम्ही आमच्या कर्तृत्वाने . . . . जे करावयाचे ते स्वतंत्रपणे करू ४९७
आमचे तरुण विद्यार्थी भाईंच्या व रॉयिस्टांच्या नादाला लागतात. पण ज्या लोकांनी सतत विरोध केलेला आहे, त्यांना आजच पुळका का आला, हे समजून घेतले पाहिजे. गुळाच्या ढेपीला मुंगळे जडतात ते ती गुळाची ढेप जतन करण्याकरिता नसून खाण्याकरिता जडतात. अस्पृश्य लोक गुळाची ढेप आहेत. म्हणून कम्युनिस्ट, रॉयिस्ट हे मुंगळे आले तर गूळ खातील ही गोष्ट
सर्वांनी ध्यानात घेतली पाहिजे.
स्वराज्य म्हणजे काय हे आम्हाला चांगले कळते. कम्युनिस्ट किंवा इतर कोणी सांगितले तरच आम्हाला कळेल अशातला काही अर्थ नाही. आम्ही काँग्रेसला राजकारण शिकवू शकतो. आम्ही आमच्या कर्तृत्वाने व हिंमतीने देशाकरिता व स्वर्तःकरिता जे काय करावयाचे ते स्वतंत्रपणे करू. कोणाच्या साहाय्याची आम्हास जरूरी नाही. या देशात हिन्दू आणि मुसलमान यात तडजोड करून राष्ट्रीय सरकार आणण्याची खटपट चालल्याचे बरेच दिवसांपासून माझे कानावर आले आहे. त्या लोकांनी ४० टक्के मुसलमान, बाकीचे इतर असा फॉर्मुला कोणत्या तत्त्वावर बनविला आहे ते मला काही कळत नाही. २२ टक्के मुसलमानांना ४० टक्के व अस्पृश्य आणि शीख ३० टक्के असताना त्यांना २० टक्के ! हा न्याय कोठला ? मला हिन्दू लोकांची कीव वाटते. हिंदुंना पूर्ण ठाऊक आहे की अस्पृश्य समाज निर्धन, दडपलेला व मागासलेला आहे. असे असता त्यांना फक्त २० टक्केच व जे राजवंशाचे त्यांना ४० टक्के ! हा काय न्याय आहे ?
एका तरूण मनुष्याला त्याच्या रांडेपासून चार मुले झाली. ती बाई मेल्यावर तो मनुष्य साधु बनला, त्याचे नाव गुरुघंटाळ. त्याचा एक शिष्य व एक वामनभट नावाचा मित्र व ही चार पोरे असा त्यांचा परिवार होता. एकदा त्याला एका गृहस्थाने श्राद्धानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. गुरुघंटाळाने यजमानास आठ पोळ्या करावयास सांगितले. त्या अशासाठी की रवतःकरिता ४, वामनभटाकरिता २, शिष्याकरिता १ व बाकीची १ चार पोरांकरिता !! हाच न्याय राष्ट्रीय सरकार बनवू इच्छिणाऱ्यांना लावला तर काय दिसून येईल ? काँग्रेसवाले हिन्दू म्हणतात आम्हाला ३, मुसलमानांना ३ व बाकीच्या २ इतरांना !
आपण आपली तयारी ठेवली पाहिजे. आता जी घटना होणार ती शेवटचीच होणार. याच वेळी आपण जोरदार लढा दिला पाहिजे. ही शेवटची वेळ आहे. आतापर्यंत काँग्रेस व हिन्दू लोक यांच्याशीच आपला भांड होता.