५०० डॉ. बावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
या अडचणींना आपल्याला तोंड द्यावे लागते. असे देखील, आपल्या लोकांच्या अविरत मेहनतीमुळे व निस्वार्थीपणामुळेच आज फे एवढा मोठा विस्तार झाला आहे. फेडरेशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष श्री. महादेव जाधव यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावेत अशी माझ्याकडून अपेक्षा करीत असाल याची मला खात्री आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की, त्यांच्यात संघटनाचातुर्य वाखाणण्यासारखे आहे. या अधिवेशनाच्या अपूर्व यशाचे श्रेय बऱ्याच अंशी त्यांना आणि त्यांच्या आहे.
आजच्यासारख्या प्रसंगी आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रश्नांसंबंधी मी बोलावे अशी आपण अपेक्षा करीत असाल परंतु अशा या प्रश्नांचा उहापोह करण्याचा आज माझा विचार नाही. मी एका महत्त्वाच्या विषयासंबंधी, हिंदुस्थानच्या भावी राज्यघटनेच्या रुपरेखेसंबंधी, बोलण्याचा माझा विचार आहे. याची निरनिराळी कारणे असू शकतील. अस्पृश्य समाजाचे हरघडीचे प्रश्न सोडविण्याची आणि त्यांच्या चळवळीचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सध्या माझ्या शिरावर नाही. माझ्या दिल्लीतील ' वास्तव्या ' मुळे ती माझ्यावर नाही आणि मी ती घेवूही इच्छित नाही. म्हणूनच फक्त अस्पृश्य समाजाच्या प्रश्नांसंबंधी मी बोलू इच्छित नाही.
अस्पृश्य समाजावर पुष्कळदा असा आरोप केला जातो की, ते स्वार्थी आहेत, देशाच्या राजकीय प्रश्नासंबंधी विधायक सूचना मात्र त्यांच्याजवळ नाहीत. हा आरोप साफ खोटा आहे. पण हा आरोप खरा आहे असे जर गृहित धरले तर तो केवळ अस्पृश्यांनाच लागू होईल असे नाही. हिंदुस्थानातील बहुतेक लोक विधायक सूचना करीत नाहीत. तसे पाहिले तर विधायक उपाय सुचविण्याची कोणातच कुवत नाही, अशातील काही प्रश्न नाही . परतु सर्व विधायक सूचना तशाच दडपल्या जाण्याचे कारण हेच की, लोकांच्या मनावर सतत प्रचाराने असे बिंबवण्यात आले आहे की, काँग्रेसच्या गोटातील निर्मितीशिवाय इतर कोणत्याही कृतीचा स्वीकार करण्यात येवू नये, तिकडे लक्ष देखील देता कामा नये. देशातील विधायक विचारसरणीला नेमकी हीच गोष्ट मारक झाली आहे. असे असताही अस्पृश्य समाजावरील आरोप नाहीसा करण्यासाठी मी अस्पृश्य समाजाच्यावतीने देशाच्या सर्वसाधारण राजकीय प्रगतीचे मार्ग सुचवितो. देशाला जरुरी असेल तर ते घ्यावेत.
आजच्या प्रसंगी, लोकांच्या सर्वसाधारण हिताच्या विषयावर बोलण्याचे मी ठरविले त्याचे हे दुसरे कारण आहे.