५०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
गोष्टींसाठीच ' घटनाभंग ' कलमाची आवश्यकता असते. लोकात शांतता
आणि सुरक्षितता राखण्यासाठी या कलमाचे अत्यंत महत्त्व आहे. हे एकच एक
कलम असे आहे की, ज्यायोगे अराजकतेपासून देशाचे संरक्षण करता
येते. कारण ज्यावेळेस सनदशीर सरकार मोडून जाते त्यावेळेस राज्यकारभार
चालविण्यास याच कलमाचा उपयोग होतो.
घटनेप्रमाणे बनविले गेलेले सरकार आणि ते मोडले तर त्या जागी येणारे
कामचलाऊ सरकार नेमण्याची घटनेमध्ये ' घटनाभंग “ कलमान्वये जी तरतूद
करण्यात आली होती ती आवश्यक होती. आवश्यक होती म्हणण्याचे कारण
घटनेप्रमाणे सरकार बनविण्याचे अधिकार जरी हिंदी लोकांना देण्यात आले होते
तरी ते घटनेप्रमाणे बनविण्यात आलेले सरकार मोडल्यास राज्य चालविण्याचा
अधिकार मात्र ब्रिटिश सरकारने स्वतःकडेच ठेवला होता.
भावी राज्यघटनेत हा फरक, ही तरतूद ठेवता येणे शक्य होणार नाही. भावी
राज्यघटनेनुसार ब्रिटिशांना, हिंदी लोकांना घटनेप्रमाणे सरकार बनविण्याचा
अधिकार देता येणार नाही. इतकेच काय, पण ते सरकार मोडले तर राज्य
चालविण्याचा अधिकारही त्यांच्याकडे राहाणार नाही. त्याचे कारण उघड
आहे. हिंदुस्थानला वसाहतींच्या स्वराज्याचा दर्जा नाही असे धरूनच आज-
तागायतची हिंदुस्थानची राज्यघटना बनविण्यात आली होती. परंतु भावी
राज्यघटनेत तसे धरून चालता येणार नाही. वसाहतींचे स्वराज्य नसलेल्या देशाच्या घटनेत ' घटनाभंग ' कलम असणे क्षम्य आहे. परंतु वसाहतीचे स्वराज्य देणारी घटना आणि ' घटनाभंग ' कलम असणारी घटना या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत. वसाहतींचे स्वराज्य असलेल्या किंवा स्वातंत्र्य असलेल्या देशात एक तर घटनात्मक सरकार असू शकेल नाही तर बंडाळी तरी असेल.
याचा अर्थ काय ? याचा अर्थ असा की, हिंदी राज्यघटनेला काळे फासले जाण्याची शक्यता दिसताना, ती तयार करणे अगदी अशक्य गोष्ट आहे. हीच गोष्ट थोडी निराळ्या भाषेत मांडू या. घटना अशाप्रकारे तयार केली पाहिजे की, तिने हिंदुस्थानातील सर्व घटकांचे हुकूम मानले पाहिजेत आणि त्या सर्वांचा मानही ठेविला पाहिजे. सर्वानी, जरी सर्वांनी नाही, तरी, नाही नाही, वाटेल ते झाले तरी हिंदुस्थानातील सर्व महत्त्वाच्या घटकांनी तिला उचलून धरण्यास सिद्ध झाले पाहिजे व तिला संपूर्ण पाठिंबा दिला पाहिजे. जर हिंदी लोकांनी, हिंदी लोकांसाठी आणि हिंदी लोकांच्या इच्छेनुरूप त्यांची अनुमती घेऊन घटना तयार केली, तरच ही गोष्ट घडेल. ब्रिटिश सरकारने जर घटना लादली