६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 550

५१० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

न होता मुसलमानेतरांकडून मुसलमानांना ती एक शिक्षाच होईल. ताबा ठेवण्यासाठी अदलाबदल व एकी करण्याची शक्‍यता वाटणे अगर काही जमातींनी रचलेला व्यूह इतरांनी फोडणे यासारख्या गोष्टी घटना समितीत घडतील. अशा प्रकारचा विचार सप्रू कमिटीने केला नाही, असे मला खेदाने म्हणावे लागत आहे. तीन चतुर्थांश बहुमतावर जर प्रत्येक घटकांपैकी कमीत कमी शेकडा ५० सभासदांचा समावेश करण्यासंबंधी काही तरतूद करण्यात आली असती तर काही तरी सुरक्षितता निर्माण झाली असती.

युनायटेड स्टेट्सूची घटना तयार करताना जे धोरण स्वीकारण्यात आले होते त्याचाच जर अवलंब केला असता तर समितीच्या बाहेर असणाऱ्या अल्पसंख्यांक जमातींच्या प्रतिनिधीकरवी, सप्र कमिटीला घटना समितीच्या निर्णयामध्ये अल्पसंख्यांकांना भाग घेण्यासंबंधी मंजूरीकरिता वाटेल तशी आणखी तरतूद करिता आली असती. अशा प्रकारची तरतूद सप्रू कमिटीच्या योजनेत आढळून येत नाही. याचा परिणाम असा झाला आहे की, ही घटना समिती म्हणजे एक ' पाश : तयार झाला आहे.

घटना समितीच्या योजनेविरूद्ध कितीतरी विधाने करता येतील. मजवर ज्याचा फारच परिणाम झाला आहे, अशा एकाचाच मी उल्लेख करीत आहे. स्कॉटलंड व इंग्लंड यांच्या एकीकरणाचा इतिहास वाचीत असताना स्कॉटिश पार्लमेंटची मान्यता मिळविण्यासाठी लाचलुचपतीसारखे जे निंद्य प्रकार घडले ते वाचून मला अगदी जोराचा धक्का बसला. सबंध स्कॉटिश पार्लमेंट विकत घेण्यात आले होते. ठराविक घटकांच्या इच्छेनुरुप निर्णय मिळविण्यासाठी घटना समितीच्या सभासदांना लाचलुचपत देऊन, विकत घेण्यासारखे निंद्य प्रकार घटना समितीत होण्यास फारच जागा आहे आणि ही गोष्ट, माझी अशी खात्री आहे की, त्यांचे हे प्रयत्न केव्हाही निष्फळ होणार नाहीत आणि असे जर झाले तर त्यामुळे घटना समितीची नुसती टवाळकीच होऊन थांबणार नाही तर माझी अशी पक्की समजूत आहे की, तिने दिलेला निर्णय अंमलात आणण्यासाठी एखाद्याने प्रयत्न केल्यास आपापसात लढाई, दंगे झाल्याशिवाय राहाणार नाही. पूर्णपणे विचाराअंती माझे असे ठाम मत झाले आहे की, घटना समितीच्या सूचनेमुळे काहीएक फायदा न होता मोठा धोकाच मात्र निर्माण होणार आहे आणि म्हणून तिला धुडकावून लाविलीच पाहिजे.

नवीन मार्गाची आवश्यकता

` मला विचारण्यात येईल की, जर घटना समितीचा अवलंब करणे अगदी अयोग्य आहे तर मग आपण कोणता मार्ग सुचवू शकता ? मला माहिती आहे की, अशा प्रकारचा प्रश्‍न मला विचारतील परंतु मजवर माझा पूर्ण विशवास आहे. जातीय