१८ डॉ. वावासाहेव आंबेडकर लेखन आणि भाषणे
परंतु ह्या चांभार लोकांनी आरंभापासून माझ्या कोणत्याही कार्यात भाग घेतलेला नाही. इतकेच नाही पण मी राउंड टेबल परिषदेमध्ये स्पृश्य हिंदुंशी व सरकारशी झगडत असता आंबेडकर आमचे पुढारी नाहीत, त्यांचे म्हणणे आपण कबूल करू नये, अशा तारा पार्लमेंटला ह्या लोकांनी केल्या असून नाशिक सत्याग्रह चालू असता आपल्या लोकांवर स्पृश्य लोकांकडून जो दगडा-विटांचा वर्षाव झाला त्यात चांभार सामील होते. (धिक्कार धिक्कार, शेम शेम) हे मला पक्के माहीत आहे. तेव्हा आपण विचार करा. जे लोक माझ्या कार्याच्या आड येतात किंवा काँग्रेसच्या बगलेत घुसून माझ्या कार्याच्या मार्गात काटे पेरतात त्या लोकांना आम्ही आमचे का म्हणावे ? आणि त्यांनी तरी आमच्याकडे याचना का करावी ? हल्लीदेखील प्रत्येक ठिकाणी हे चांभारलोक काँग्रेस तिकीटावर उभे राहून आपल्या पक्षाच्या उमेदवाराला उघड-उघड विरोध करीत आहेत. तुमच्या जिल्ह्यात रा. रोहम यांना विरोध करण्याकरिता सोनवणे नावाचे गृहस्थ उभे आहेत. काही स्पृश्य लोक म्हणतात की सोनवणे हा बी. ए. एलएल. बी. झालेला असून रा. रोहम फक्त मॅट्रिक आहेत. पण अशा लाखो बी. ए. ला पुरून उरणारा मी रोहमच्या पाठीमागे आहे ना. ( प्रचंड टाळ्यांचा कडकडाट व बाबासाहेबांच्या नावाचा जयजयकार ) श्री. सोनवणे कोणत्याच पक्षातर्फे उभे राहिले नसल्यामुळे त्याने जर तुमच्यासाठी काहीच केले नाही तर तुम्ही कोणाला जबाबदार धराल ? रा. रोहम हे माझ्या स्वतंत्र मजूर पक्षातफं उभे असल्यामुळे त्यांच्या कार्याची जबाबदारी माझ्यावर आहे. (टाळ्या) म्हणून मी सांगतो की तुम्ही आपल्या मतांच्या तिन्ही फुल्या श्री. रोहमच्या घोड्यापुढे करा (' होय होय बाबासाहेब ' लोक ओरडतात) श्री. सोनवणे यांना एकही मत देऊ नका (नाही नाही मुळीच नाही).
ह्या देशामध्ये सुशिक्षित व श्रीमंत लोकांचे बरेचसे प्रबळ पक्ष आहेत तसा माझाही हा एक लहानसा स्वतंत्र मजूर पक्ष आहे. यापेक्षा काही पक्ष असे आहेत की, त्यांच्या आणि माझ्यामध्ये जमीन अस्मानाचे अंतर आहे व काही पक्ष असे आहेत की, त्यांच्या आणि माझ्यामध्ये थोडे अंतर आहे. काँग्रेस आणि माझा पक्ष यांच्यामध्ये जो फरक आहे तो म्हणजे काँग्रेसने श्रीमंत उमेदवार उभे केले आहेत व मी माझ्या पक्षातफे गरीब उमेदवार उभे केले आहेत. तत्त्वाला बाध येऊ नये म्हणून मी माझ्या समाजातील काही श्रीमंत लोक वगळले आहेत व त्यामुळे त्यांचा माझ्यावर रोष झालेला आहे. तरी पण तत्त्वाकरिता त्यांची मला कदर वाटत नाही. काँग्रेस गरिबांची कैवारी म्हणवते व फिरोदीया सारखा श्रीमंत मारवाडी उभा करते परंतु तुम्ही विचार करा, जे मारवाडी खोटेनाटे दस्तऐवज करून व खोटे आंगठे लाऊन तुमच्या जमीनी, घरेदारे जप्त करतात, ते मारवाडी गरीब, शेतकरी, कामकरी लोकांचे कल्याण करतील असे तुम्हाला वाटते काय ? (नाही नाही) कॉग्रेसला आपली भांडवलशाही टिकवावयाची आहे व