६-५-१९४५ आम्हाला राजकीय बहुमत हवे; जातीय बहुमत नको - Page 566

५२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

ती पद्धत म्हणजे एकमतानुवर्ती राज्यकारभार ही होय. या बाबतीत हिंदू लोक

जर बारकाईने पाहाण्याचा त्रास घेतील तर त्यांची खात्री पटेल की, या प्रकारचा

राज्यकारभार हा काल्पनिक नसून खरोखरीच तो अस्तित्वात आहे. ज्यूरी

पद्धतीचेच उदाहरण घ्या. पंचांपुढे चौकशी चालू असताना एकमताच्या

तत्त्वाचाच अंगिकार करण्यात येतो. पंचांनी एकमताने दिलेल्या निर्णयानुसार

न्यायमूर्तीला वागणे भाग पडते. त्यात त्याला यत्किंचितही ढवळाढवळ करता

येत नाही. लीग ऑफ नेशन्सचे दुसरे उदाहरण घ्या. लीग ऑफ नेशन्सच्या

निर्णयाबाबत कोणत्या नियमाचा स्वीकार केला होता? एकमताने कारभार

चालविणे हाच तो नियम होय! कायदेमंडळात अगर कार्यकारी मंडळात निर्णय

घेण्याच्या बाबतीत हिंदुंनी जर एकमताच्या तत्त्वाचा अवलंब केला तर या भारत

वषति जातीय प्रश्‍नाचा मागमूस देखील शिल्लक राहिला नसता.

एखादी व्यक्ती हिंदुंना असा प्रश्‍न विचारू शकेल की, जर ते अल्पसंख्यांकांना

घटनेद्वारे संरक्षण द्यावयास तयार नाहीत तर एकमताच्या तत्त्वाचा अंगीकार करण्यास ते सिद्ध आहेत का? पण दुर्दैव हे की यापैकी कोणत्याच तत्त्वाचा स्वीकार करण्यास ते तयार नाहीत.

बहुमतानुवर्ती राज्यकारभाराविषयी म्हणाल तर हिंदू लोक कोणत्याच बंधनास मान्यता देण्यास तयार नाहीत. त्यांना बहुमत पाहिजे पण ते संपूर्ण बहुमत पाहिजे. सापेक्ष बहुमताने त्यांचे केव्हाही समाधान होणार नाही. संपूर्ण बहुमतावर हिंदुंनी जो एवढा भर दिला आहे तो राजकारणातील मुरब्बी लोकांच्या दृष्टीने कितपत न्याय्य आहे याचा त्यांनी अवश्य विचार करावा. ज्या संपूर्ण बहुमताच्या तत्त्वावर हिंदुनी भर दिला आहे त्या तत्त्वास युनायटेड स्टेट्सूचा. बिलकूल पाठिंबा नाही, याचा हिंदुंना लवलेशही नसावा.

युनायटेड स्टेट्सूच्या घटनेतील मुद्दा उदाहरणादाखल घेऊ या. या घटनेमध्ये मूलभूत हक्कांना केंद्रीभूत करणारे एक पोट-कलम आहे. या पोट-कलमाचा अर्थ काय आहे ते आपण पाहू या. याचा अर्थ हा की, ज्या सर्वश्रेष्ठ गोष्टीचा मूलभूत हक्कात समावेश करण्यात आला आहे, त्यामध्ये बहुमत ढवळाढवळ करण्यास अगदी असमर्थ आहे. याच घटनेतील दुसऱ्या एका उदाहरणाकडे पहा. यापासून असा स्पष्ट बोध होतो की, जर घटनेतील कोणत्याही विभागात थोडाफार फरक करावयाचा असेल तर त्यास तीन चतुर्थांश बहुमताची आवश्यकता लागते आणि शिवाय सर्व संस्थानांची संमती लागते. यापासून एकच गोष्ट दृष्टोत्पत्तीस येते आणि ती ही की. युनायटेड़ स्टेट्सूची घटना विशिष्ट उद्देश दर्शविते आणि बहुमतानुवर्ती राज्यकारभार अगदी फोल आहे याची ग्वाही देते.