५२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
राजकारणातून जरी बहुमतानुवर्ती राज्यकारभाराचे उच्चाटन करण्यात आले तरी हिंदुंच्या जीवनातील इतर पुष्कळशा गोष्टींवर काही एक परिणाम होणार नाही. सामाजिक जीवनातील मूलभूत तत्त्वांनुसार ते बहुसंख्यांक राहातीलच. व्यापार व उद्योगधंदे त्यांची मिरासदारी आहे व ती यापुढेही राहणारच. हिंदुंनी एकमतानुवर्ती राज्यकारभाराचा स्वीकार करावा असे काही माझी योजना सांगत नाही किंवा त्यांनी बहुमतानुवर्ती राज्यकारभाराचा त्याग करावा असाही काही उपदेश करीत नाही. मला त्यांना हेच सांगावयाचे आहे की, सापेक्ष बहुमतात त्यांनी समाधान मानावे. या गोष्टीला जर त्यांनी मान्यता दिली तर त्यांनी फारच मोठी गोष्ट केल्यासारखे होणार आहे.
असा कोणत्याही प्रकारचा त्याग न दाखविता * अल्पसंख्यांक हिंदी स्वातंत्र्याला खो घालतात ' असे बहुसंख्य हिंदू सर्व जगाला सांगत आहेत ते अगदी अन्याय आहे व यामुळे त्यांचा काही एक फायदा होणार नाही. कारण, तशा प्रकारचा
प्रयत्न अल्पसंख्यांकांनी अद्यापि केलेला नाही, उलटपक्षी स्वातंत्र्यासाठी वाटेल तो आत्मयज्ञ करण्यास ते तयार आहेत. मात्र त्यांना समाधानकारक संरक्षण : मिळाले पाहिजे. हे त्यांचे कृत्य अपकारक आहे अशी समजूत हिंदुंनी करून घेता कामा नये. आयर्लंडमध्ये घडलेल्या गोष्टीच्या अगदी विरुद्ध अशी ही गोष्ट आहे. एकदा आयर्लंडच्या राष्ट्रीय पक्षाचे नेते श्री. रेडमंड, अल्स्टर परगण्याचे पुढारी कार्सन यांना म्हणाले, ' वाटेल ते संरक्षण मागा, त्याला माझी ना नाही, परंतु तुम्ही संयुक्त आयर्लडला संमती द्या.' असे म्हणतात की, हे ऐकून तो चटदिशी वळला व असे आवेशयुक्त वाणीने वदला की, ' मसणात जावू द्या तुमचे संरक्षण, तुमची सत्ता आम्हास बिलकूल मान्य नाही.' हिंदुस्थानातील अल्पसंख्यांकांनी अशाप्रकारचे उत्तर दिले नाही. त्यांचे समाधान होण्यास संरक्षण पुरेसे आहे. म्हणून मी हिंदुंना विचारतो की, ही गोष्ट योग्य नव्हे काय ? माझी अशी खात्री आहे की, ती योग्यच आहे.
| उपसंहार
जातीय प्रश्नावर तोड काढण्यासाठी माझ्या मनात ज्या गोष्टी घोळत होत्या त्या मी आपणासमोर मांडिल्या आहेत. अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्टस् फेडरेशनला त्या बंधनकारक नाहीत, इतकेच नव्हे तर त्या व्यक्तिश: मलासुद्धा बंधनकारक नाहीत, त्या गोष्टींना तुमच्या पुढे मांडून मी फक्त एक नूतन मार्ग दाखविला आहे, यापेक्षा अधिक काहीही केलेले नाही. मी जी तत्त्वे प्रतिपादिली आहेत त्यावर माझ्या योजनेपेक्षा फारच भर दिला आहे. त्या तत्त्वांचा जर अंगिकार केला तर माझी अशी खात्री आहे की, जातीय प्रश्नावर तोड काढण्यासाठी जो गोंधळ माजला आहे तो बराचसा कमी होईल.