४-१०-१९४५ आपल्या प्रगतीसाठी देशाला मिळणाऱ्या सत्तेमध्ये आपण भागीदार झालेच पाहिजे - Page 587

आपल्या प्रगतीसाठी देशाला . .. . . झालेच पाहिजे ५४७

संध्याकाळी अहिल्याश्रमाच्या पटांगणात रा. ब. एन. शिवराज यांच्या

अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या प्रचारार्थ प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. सदर

सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर खास भाषण करणार असल्याचे हस्तपत्रिकांद्वारे

व गेल्या जनता पत्राच्या अंकात जाहीर झाले असल्यामुळे सभेस प्रचंड जनसंमर्द

जमा झाला होता. या सभेत येत्या निवडणुकी व अस्पृश्य समाजाचे भवितव्य

याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अत्यंत ओजस्वी असे भाषण

झाले. लोकसमुदाय ५० हजारपर्यंत होता. 'आंबेडकर झिंदाबाद' च्या

गगनभेदी घोषणांनी सर्व वातावरण निनादून गेले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुजनो,

आज ही सभा भरविण्यात आली आहे तिचा मुख्य उद्देश आगामी निवडणुकांचा

प्रचार आहे. आज मला अस्पृश्य समाजाला वेळीच सूचना, चेतावणी द्यावयाची

आहे. आता जी भाषणे झाली ती फार महत्त्वपूर्ण होती. ही भाषणे ज्यांनी केली

ते कदाचित उमेदवार असू शकतील. म्हणून त्यांनी ती मोठ्या आवेशाने

केली. पण मी काही उमेदवार नाही. (हंशा) मला इलेक्शनला उभे राहाण्याची

इच्छा नाही, म्हणून माझ्या भाषणात आपणास आवेश आढळणार नाही. मी जरी

आज कमान्डर-इन-चीफ नसलो तरी अस्पृश्य समाजाचे पुढारीपण माझ्याकडे

अंशतः तरी आहे. म्हणून माझ्या अनुयायांच्या बऱ्यासाठी मी माझ्या अनुभवावरून

सल्ला देण्यासाठी उभा आहे.

ही जी निवडणूक आहे, तिच्याकडे पाहून मला एका गोष्टीची आठवण

होते. तुकारामाने म्हटले आहे की, “आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या, भटा झाली

मेजवाणी'' ही निवडणूक सिंहस्थ पर्वणी आहे. इतर पक्षांना ही एक मेजवानी वाटते. पण ही म्हण अस्पृश्य समाजास मात्र मुळीच लागू नाही.

असा समज होता की, राजकारण फक्त ब्राह्मणालाच येते. राजकारण खेळणे हा फक्त भटांचा मक्ता होता आणि हे थोडेसे खरे देखील होते. कारण लोकल बोर्डस्‌, म्युनिसीपालट्या, कायदेमंडळे यात फक्त ब्राह्मण सभासद होते. परंतु आता मी म्हणू शकेन की, या देशात राजकारण फक्त अस्पृश्य आणि ब्राह्मण यांनाच कळते. फक्त दहा वर्षात हा फरक झाला आहे. १८९२ पासून ' लोकनियुक्त पद्धती सुरू झाली. हळूहळू हिंदू, मुसलमान आणि खिश्चन यांना त्यात आपापल्या परीने भाग घेता येऊ लागला. आश्चर्य हे की, १९३५ पर्यंत अस्पृश्य समाजास मतदानाचा हक्क नव्हता. अर्थात १९३५ पर्यंत मतदान,