५५० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
येत होते. गांधींची तरी काही कमी व्यवस्था नव्हती. एवढेही करून शेवटी
मला सोडा म्हणून गांधींनी व्हाईसरॉयला पत्र लिहिले. परंतु व्हाईसरॉय काहीच
ऐकावयास तयार होईना. निदान मला भेटावयास तरी बोलवा असे गांधींनी पत्र
लिहिले, त्याचा देखील काहीच उपयोग झाला नाही. शेवटी गांधींनी कसे तरी
करून आपली सुटका करून घेतली.
आता १९४५ साली सिमला कॉन्फरन्सचे काय झाले याचा विचार करू.
असेंब्लीमध्ये असा नियम होता की, व्हाईसरॉय एकदा ठराव वाचून दाखवित
असता सर्वांनी उठून उभे राहावयाचे. नियमाप्रमाणे आम्ही सर्वजण उठून उभे
राहत असू. काँग्रेसचे लोक मात्र तसेच बसून राहत असत. त्यांना उठून उभे
राहण्याची लाज वाटत असे. त्यांचे म्हणणे असे की, आम्ही व्हाईसरॉयला मानीत
नाही. तेव्हा त्यांच्यापुढे आम्ही उभे राहणार नाही. परंतु सिमला कॉन्फरन्सच्या
वेळी आपणास काय दिसले ? व्हाईसरॉयनी जाहीर केल्याबरोबर काँग्रेसचे सर्व
पुढारी नाक मुठीत धरून सिमल्याला पळत सुटले. कोणी गाडीतून गेला, कोणी
घोड्यावरून गेला, तर कोणी गाढवावरून गेला. सिमल्याला त्य'नी गर्दी केली. सिमल्याला त्यांची एवढी गर्दी झाली की, त्यांनी सिमल्याची अगदी घाण करून टाकली. जे लोक व्हाईसरॉयला मानीत नव्हते तेच लोक व्हाईसरॉयच्या घराजवळ धरणे धरून बसले.
असे हे गांधींचे राजकारण आहे. हे पराजिताचे राजकारण आहे. . काँग्रेसचे लोक ही राजकारणात नापास झालेली पोरे आहेत. आपण नापास झालेल्या पोराला नोकरीवर घेत नाही. कारण तो लायक नसतो. म्हणून काँग्रेसचे पुढारी राजकारणात अगदी नालायक आहेत.
कॉग्रेसच्या लोकांजवळ इतका पैसा आहे की, त्या पैशाच्या जोरावर वाटेल ते करता येईल. परंतु या पैशाचा काय उपयोग झाला ? हिदू लोकांनी जो एवढा स्वार्थत्याग केला त्याचा काय उपयोग झाला ? जनतेने जो एवढा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे स्वार्थत्याग केला त्याचा उपयोग काय झाला ? ज्या माणसाला एवढी परिस्थिती अनुकूल असता काही करता येत नाही तो पुढारीपणाला नालायक असला पाहिजे.
आता मी दुसरी बाजू सांगतो. या देशात अशा असंख्य जाती आहेत की, ज्यांच्यात संघटना नाही. त्यांच्यात अनेक भेदाभेद आहेत. कारण ते अनेक धर्माचे व अनेक जातींचे आहेत. सर्व लोक आपापसातले भेद विसरून एकमेकावर विश्वास ठेवून, एकमुखाने जर काही मागू लागले तरच त्यांचा थोडा