पपु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
माझे असे ठाम मत आहे की, विद्यार्थी दशेत विद्यार्थी-विद्यार्थीनीनी राजकारणात
भाग घेता कामा नये. कारण अभ्यास सोडून ते जर राजकारणात पडले
तर त्यांच्या आयुष्याचे नुकसान होते. परंतु यावेळी मात्र तो नियम. ढिला
केला पाहिजे. त्यांनी आपल्या अडाणी जनतेला मतदारांच्या यादीत नाव
घालावयास मदत केली पाहिजे. त्यांना निवडणुकीची सर्व माहिती दिली
पाहिजे.
हे इलेक्शन हिंदुस्थानच्या इतिहासात स्मरणीय होणार आहे. कारण घटनेचा
नवीन बंधारा तयार करावयाचा आहे. या इलेक्शननंतर जी घटना समिती
निर्माण होणार आहे, ती जे काही घटनेचे बंधारे तयार करणार आहे, ते बंधारे
पुष्कळ दिवस टिकणार आहेत. त्या भावी घटनेत आपला भाग काय राहील
याकडे आपण सर्वानी लक्ष दिले पाहिजे. आपण जे निरनिराळे ठराव पास केलेले आहेत त्यामध्ये आपली योजना आपण जाहीर केली आहे. हे इलेक्शन म्हणजे खरोखरच आपल्या जीविताचा किंवा मरणाचा प्रश्न आहे. आपण जर यावेळी जागृत राहिलो नाही तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे हे जे 'स्वराज्य' होणार आहे ते आपल्यावर जुलमी राज्य होणार आहे.
आपणाला योग्यवेळी मार्ग दाखविण्याचे मी माझे कर्तव्य बजाविले आहे तुम्ही तुमच्या कर्तव्यास कितपत जागता हेच मला पाहावयाचे आहे. तुम्ही आपले कर्तव्य योग्य तऱ्हेने पार पाडाल याची मला खात्री आहे
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर पुष्पहारादी समर्पण समारंभ होऊन सभा विसर्जित झाली.
या तीन दिवसांच्या वरील कार्यक्रमाशिवाय अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या वर्किंग कमिटीची सभा अहिल्याश्रमात ता. २-१०-४५ रोजी श्री. जे. एच. सुबय्या यांचे अध्यक्षतेखाली होऊन मागील कामकाजाचा आढावा घेतला गेला व दलाच्या घटनेत काही दुरुस्ती करण्यात आली. तसेच अ. भा. दलाचे शिक्षण केद्र नागपूर येथे उघडण्याचे ठरविण्यात येऊन त्याच्या व्यवस्थेची जबाबदारी जनरल सेक्रेटरी आर. आर. पाटील (नागपूर) यांचेवर सोपविण्यात आली व सभेचे काम संपविण्यात आले. ता. ४-१०-४५ रोजी पुणे येथील समता सैनिक दलाच्या अजिक्य पथकास रा. ब. शिवराज यांनी श्री. पी. एन. राजभोज व श्री. आर. डी भंडारे यांचे समवेत भेट दिली. सदर प्रसंगी दलाच्या पथकातर्फे रा. ब. शिवराज यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
अशाप्रकारे वर्किंग कमिटीच्या बैठकीच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम पार पाडले गेल्यामुळे तिनही दिवस मोठ्या आनंदाचे व उत्साहाचे गेले.