५७२ डॉ. बावासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
हाच प्रश्न मी काँग्रेसच्या लोकांना व गांधींना आज वीस वर्षे विचारीत आहे. या प्रश्नाचे उत्तर ते देत नाहीत आणि ज्याअर्थी ते उत्तर देत नाहीत त्याअर्थी त्यांच्या पोटात काही तरी काळेबेरे आहे हे सिद्ध होते.
हे जे स्वराज्य मिळणार आहे त्या स्वराज्यात आम्हाला काय मिळणार याचा तुम्ही विचार केला पाहिजे.
आज आपल्यावर कोणती कामे लादण्यात आलेली आहेत ? झाडू मारणे, गटारे साफ करणे वगैरे. काँग्रेसच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या मिळाल्या तर आमच्यावर पूर्वापार चालत आलेल्या गुलामगिरीवर शिक्कामोर्तब होणार आहे. झाडू मारणे, गटारे साफ करणे हीच कामे आमच्यावर लादण्यात येऊन आमची दुर्दशा कोणत्या थरास जाईल हे सांगता येत नाही.
आज मी एवढा खटाटोप करून दरवर्षी ३ लाख रुपये आपल्या समाजातील मुलांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याकरिता सरकारातून खर्च होण्याची सोय केली आहे. ३ लाख रुपयाचे ५ लाख करण्याचा मी सध्या प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ आठ टक्के जागा सरकारी नोकऱ्यात आपल्या उमेदवारांना मिळण्याची सोय करण्यात आलेली आहे. आपल्या प्रगतीकरिता आजपर्यंत या व इतर ज्या काही सरकारी सवलती व सरकारी मदत मिळाली व मिळत आहे ते सर्व काही काँग्रेसच्या लोकांच्या हाती राजकारणाच्या किल्ल्या गेल्या की नेस्तनाबूत होणार आहे.
हा सर्व खटाटोप मी का करीत आहे? आपणाला माऱ्याच्या जागा, अधिकाराच्या जागा हस्तगत करावयाच्या आहेत. किल्ले सर करावयाचे आहेत म्हणून. त्याशिवाय आपणाला तरणोपाय नाही. किल्ल्यावरूनच शत्रुच्या सैन्याची टेहळणी करता येऊन शत्रूवर जोराचा मारा करता येतो. शत्रुने सर्व प्रांत जरी व्यापला तरी जोपर्यंत किल्ले ताब्यात असतात तोपर्यंत कशाचेही भय बाळगण्याचे कारण राहात नाही.
पेशवाईच्या काळात काही इंग्रजांचे राज्य नव्हते, अगर मुसलमानांचेही नव्हते. त्यावेळेस पूर्ण स्वराज्य होते. त्या स्वराज्यात आपली काय परिस्थिती होती ?
अस्पृश्य जातीच्या मनुष्याने रस्त्यावर थुंकू नये म्हणून त्याच्या गळ्यात गाडगे अडकविण्यात आले होते. त्याचप्रमाणे रस्त्याने चालताना त्यांची पावले उमदू नयेत म्हणून त्याच्या पाठीमागे झाडू बांधण्यात येत असे. पेशव्यांच्या स्वराज्यात अस्पृश्यांची जी दैना झाली तशीच दुर्दशा हिंदू लोकांच्या हाती स्वराज्य गेल्याने अस्पृश्यांची होणार आहे, हे कोणीही विसरता कामा नये.