९-१२-१९४५ अधिकारांचे किल्ले ताब्यात असले तर भय बाळगण्याचे कारण नाही - Page 613

अधिकारांचे किल्ले ताब्यात . . . . कारण नाही ५७३

आजही हे भिक्षापात्र अवलंबणारे ब्राह्मण लोक अधिकाऱ्याच्या जागेपासून तो तहत क्लाकच्या जागेपर्यंत सरकारी जागा व्यापून आपले स्थान कायम राखून

आहेत.

कोणत्याही गावात मुसलमानांचे एक घर असले तरी त्याच गावात राहाणारे हजार-पाचशे स्पृश्य हिंदू लोक त्याची किती मनधरणी करतात. त्याच्याकडे ब्र शब्द काढण्याची कोणाची ताकद नसते आणि त्याच गावात, स्वधर्मीय अशा पाच-पंचवीस अस्पृश्य लोकांना हेच स्पृश्य हिंदू ठोकरीने उडवितात. इंग्रज आमदानीत स्वराज्य मागणाऱ्या या स्पृश्य हिंदुंच्या हाती जर स्वराज्य गेले तर आपली दशा काय होईल याचा विचार करा.

हिंदुस्थानात युरोपियन, मुसलमान, शीख, अँग्लो-इंडियन, पारशी, खिश्चन वगैरे अल्पसंख्यांक जाती आहेत. सर्वसाधारण राजकारण जाणणारा कोणताही मनुष्य तुम्हाला सहज सांगू शकेल की, या सर्व जातींपैकी राजकीय संरक्षणाची खरोखर आवश्यकता जर कोणाला असेल तर ती अस्पृश्य समाजातील लोकांनाच आहें. असे असताना काँग्रेसचे लोक आजपर्यंत काय करीत आले आहेत ? १९३०-३२ साली विलायतेला जी राऊंड टेबल कॉन्फरन्स भरविण्यात आली त्यावेळी अस्पृश्य समाजातफे मला जाण्याचा प्रसंग आला. अस्पृश्य समाजाकरिता प्राणांतिक उपोषण करणाऱ्या गांधींनी त्यावेळी काय केले ?

गांधींकडे खिश्चन, युरोपियन, पारशी, शीख, मुसलमान या अल्पसंख्यांक लोकांनी राजकीय संरक्षण मिळविण्याकरिता खलिते पाठविले. मुसलमानांखेरीज सर्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मीही अर्ज पाठविला होता. या प्रसंगी गांधींना भीती वाटत होती की, हे सर्व लोक एक होतील. असे झाल्यावर काँग्रेसला सुरुंग लागेल आणि हे लोक आपली रेवडी उडवतील. म्हणून गांधींनी मुसलमान लोकांशी गुप्त करारनामा केला. त्यांना सांगण्यात आले की तुमच्या ज्या काही १४ मागण्या आहेत, त्या सर्व मला मान्य आहेत परंतु अस्पृश्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्वांना तुम्ही विरोध केला पाहिजे. वास्तविक मुसलमान लोकांची लोकसंख्या व अस्पृश्यांची लोकसंख्या जवळ जवळ सारखी असून राजकीय संरक्षणाची आवश्यकता मुसलमानांपेक्षा अस्पृश्य लोकांनाच जास्त आहे. परंतु अशा रीतीने गांधींनी सर्व पक्षांचे अर्ज मंजूर करून मुसलमानांशी गुप्त करारनामा केला आणि माझा अर्ज नामंजूर केला.

अशी ही गांधींची कपटनीती आहे. काही दिवसांपूर्वी सिमला मुक्कामी जी परिषद भरविण्यात आली त्यावेळी तरी गांधींनी काय काय केले ?