२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सभेची व्यवस्था ठेवण्यासाठी समता सैनिक दलाची अनेक पथके
बोलविण्यात आली होती व त्यांनी सभेची शिस्त उत्तम राखली होती. उच्चासनावर
पक्षाच्या यशस्वी प्रतिनिधीपैकी श्री. अ. वि. चित्रे, एस. व्ही. परुळेकर,
आर. जी. भातनकर, भाऊराव गायकवाड, डी. जी. जाधव, जी. आर घांगुर्ड,
पी. जे. रोहम, बी. एच. वराळे व जे. एस. ऐदाळे हजर होते. त्याचप्रमाणे
खालसा कॉलेजचे प्रिन्सीपाल काश्मिरासिंग, प्रो. रॉय, श्री. समर्थ, बार-अँट-लॉ,
श्री. खांबे, श्री. डी. व्ही. प्रधान, कमलाकांत चित्रे, कद्रेकर, प्रिन्सिपॉल दोंदे,
श्री. केनी, जे. पी.. बापूसाहेब सहस्त्रबुध्दे, मुसाढकरबुवा, मघाळे, आर. आर.
पवार, धो. ना. पगारे, काळोखे, सुभेदार देवरुखकर वगैरे मंडळी होती. बरोबर
७ वाजता नियोजित अध्यक्ष डॉ. सोळंकी, डॉ. आंबेडकर व इतर प्रतिनिधी सभेच्या मंडपात आले. समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा सन्मान केला. सर्व मंडळी स्थानापन्न झाल्यावर सभेच्या कामाला सुरुवात झाली. श्री. चां. ना. मोहिते यांनी अध्यक्षाची सूचना दिल्यावर डॉ. सोळंकी अध्यक्षस्थानी विराजमान झाले. त्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने सवादकर यांनी पुढील ठराव सभेपुढे मांडले. स्वतंत्र मजूर पक्षातर्फे मुंबई लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यास मला फार आनंद वाटतो. सर्व सभासदांचे स्वतंत्र मजूर पक्षाच्या विद्यमाने भरलेली ही जाहीर सभा अंतःकरणपूर्वक अभिनंदन करिते.
वरील ठरावावर भाषण करताना सुभेदार सवादकर म्हणाले “ स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निवडून आलेल्या प्रतिनिर्धींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यास मला फार आनंद वाटतो. अस्पृश्य वर्गाचा लढा सर्व भारतात यशस्वीपणे लढवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी कामकरी लोकांच्या हितासाठी स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने आमच्या पक्षाला हाणून पाडण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न केले, परंतु काँग्रेसला हार खावी लागली. आमच्या पक्षाचा विजय झाला. आपले निवडून आलेले सर्व प्रतिनिधी हे आघाडीचे वीर आहेत. ते आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील याबद्दल कोणी शंका बाळगू नये."
या ठरावाला श्री. शां. अ. उपशाम यांनी अनुमोदन दिले. त्यांच्या अनुमोदनपर भाषणानंतर अध्यक्षांनी ठराव मतास टाकला व टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात तो मंजूर झाला. त्यानंतर यशस्वी सभासदांना श्री. रेवजीबुवा डोळस व श्री. संभाजी गायकवाड यांनी हारतुरे अर्पण केले. नंतर प्रत्येक यशस्वी सभासदाने आपले अभिनंदन केल्याबद्दल जमलेल्या मंडळीचे आभार मानिल्यावर अध्यक्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाषण करण्याची विनंती केली.