केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने . . . . . असे समजू नका २५
टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात उभे राहून डॉ. आंबेडकरांनी आपल्या भाषणास
` सुरवात केली, ते म्हणाले.
प्रिय बंधुंनो आणि भगिनींनो,
या ठिकाणी माझ्याबरोबर स्वतंत्र मजूर पक्षातर्फे निवडून आलेल्या सर्व सभासदांचे अभिनंदन करण्यात आले असे असता या प्रसंगी भाषण करण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर का टाकण्यात यावी, हे मला कळत नाही. तरीपण आपल्या इच्छेला मान देऊन मी दोन शब्द बोलणार आहे. मी आपल्या सार्वजनिक आयुष्यक्रमाची सुरुवात केल्यापासून तो अगदी गेल्या वर्षापर्यंत अस्पृश्य वर्गाच्या चळवळीतच कार्य करीत होतो. परंतु बदललेल्या परिस्थितीला अनुसरून मी आपल्या कामाची दिशा बदलली आणि यापुढे धर्म आणि जात यांचा 'विचार न करता सर्व शेतकरी-कामकरी वर्गाच्या हिताच्या दृष्टीने कार्य करण्याकरिता सुरुवात केली. मी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष हाच माझ्या बदललेल्या कार्यक्रमाचा द्योतक आहे. गेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने स्पृहणीयं यश मिळविले ही गोष्ट खरी असली तरी आमच्यातील दोन कळकळीचे कार्यकर्ते, डॉ. सोळंकी व सुभेदार सवादकर, हे निवडणुकीत अयशस्वी
झाले, याबद्दल माझ्याप्रमाणेच आपणा सर्वांना वाईट वाटत असेल यात शंका
नाही. निवडणुकीत अपयश आले असून देखील आजच्या या अभिनंदनाच्या
सभेत त्यांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने भाग घेतला आहे. यावरून
त्यांच्या मनाचा मोठेपणा व्यक्त होत आहे. डॉ. सोळंकी यांना असेंब्लीच्या
निवडणुकीत जरी अपयश आले असले तरी लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये
सरकार नियुक्त सभासद म्हणून बसण्याची संधी त्यांना लाभेल, अशी मला आशा
आहे.
लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल अभिनंदन
करण्याला कोणता एखादा पक्ष पात्र असेल तर तो स्वतंत्र मजूर पक्षच
होय. कारण, स्वतंत्र मजूर पक्षाला ज्या इतर पक्षांबरोबर टक्कर द्यावी लागली
ते सर्व पक्ष आमच्यापेक्षा अनेक पटीने प्रबल होते. ते सधन आणि संघटित असून
त्यांना सर्व प्रकारची परिस्थिती अनुकूल होती. मुंबई इलाख्यात कॉँग्रेस,
ब्राह्मणेतर, मुसलमान, खिश्चन वगैरे अनेक पक्षातील उमेदवार निवडणूक लढवीत
होते. त्यापैकी मुसलमानांनी सवत्या-सुभ्याचे काटेरी कुंपण आपल्याभोवती
घातलेले होते. आमचा व काँग्रेसचा आखाडा एकच होता. आमच्या बरोबर
ब्राह्मणेतर पक्षही त्याच आखाड्यात उतरला होता. परंतु स्वतःला लढवय्ये
म्हणविणाऱ्या ब्राह्मणेतर पक्षाची काँग्रेसने कशी धुळधाण उडवून दिली हे सर्वांनी
पाहिलेच आहे. त्याचप्रमाणे इतर पक्षांच्या पदरीही अपयश आले. परंतु
काँग्रेस बरोबर झालेल्या संग्रामात जर कोणता पक्ष विजयी झाला असेल तर तो