५८६ डाँ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
भारतीय कामगारांसाठी कम्युनिस्टांना, ते सांगतात त्याप्रमाणे खरोखरीच जिव्हाळा वाटतो काय ? तसे असते तर त्यांनी भारतीय कामगारांचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष संघटीत केला असता. आतापर्यंत करीत आले तसे काँग्रेसला मिळा असा कामगारांना उपदेश करीत बसले नसते.
त्यांना आता काँग्रेसने हाकलले असल्यामुळे ते आता आपल्यात शिरून आपले उपद्व्याप सुरू करू लागले आहेत. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की, कम्युनिस्टांपासून अलिप्त राहा आणि त्यांना आपल्या शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचा उपयोग त्यांच्या प्रचारासाठी करू देऊ नका.
शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन हीच भारतीय अस्पृश्यांची खरी प्रतिनिधी आहे. तिचा जोर आपल्या प्रांतात वाढतो आहे, हे या ठिकाणी भरलेल्या प्रचंड जमावाने सिद्ध झाले आहे. आपण माझे भाषण इतक्या शांततेने ऐकत आहात त्याबद्दल मला आनंद होत असून ज्या शेकडो स्वयंसेवकांनी येथील व्यवस्था राखली आहे, त्यांना माझे धन्यवाद आहेत. सर्व तरुणांना त्यांनी फेडरेशनला मिळावे व येत्या निवडणुकीत निर्वेतन काम करण्यासाठी बहुसंख्येने पुढे यावे अशी माझी विनंती आहे.
आपण अशीच साथ द्याल तर भारताच्या कारभारात आपल्याला आपला रास्त वाटा मिळालेला पाहण्याचे दिवस फार लांब नाहीत.
डॉ. बाबासाहेबांच्या भाषणानंतर त्या अफाट जनसमुदायाने हर्षोत्फुल्ल अंत:करणाने ' जयभीम ' जयघोषाचा जयजयकार केला.