२३१
अस्पृश्य समाजाने निवडणुकीत
फार जागरुक राहिले पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवार दिनांक २३ डिसेंबर १९४५ रोजी दुपारी १.३०
वाजता मुंबईहून ' मद्रास एक्स्प्रेस ' ने मद्रास प्रांताच्या दौऱ्यावर गेले. दुसरे
दिवशी सायंकाळी मद्रास स्टेशनवर पोहचले. डॉ. बाबासाहेबांचे समवेत
श्री. पी. एन. राजभोज, जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स्
फेडरेशन, हेही होते. मद्रास स्टेशनात हजारो अस्पृश्य बंधुंनी डॉ. बाबासाहेबांचे
हर्षोत्फुल्ल अंतःकरणानी अपूर्व स्वागत केले. मद्रास कार्पोरेशनचे मेयर व ऑल
इंडिया शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे अध्यक्ष रा. ब. एन. शिवराज यांनी मद्रास
प्रातातर्फ डॉ. बाबासाहेबांचा सत्कार केला. समता सैनिक दलाच्या शेकडो
सैनिकांनी डॉ. बाबासाहेबांस ' गार्ड ऑफ ऑनर दिला . 'आंबेडकर जयघोषांनी', सर्व वातावरण दुमदुमून गेले. ' पूना कराराचा धिक्कार असो ' अशा घोषणा पुकारण्यात आल्या. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाने मद्रास प्रांतात नवचैतन्य
निर्माण झाले.
तारीख २५ डिसेंबर १९४५ रोजी मद्रास येथे अस्पृश्य वर्गाच्या विराट सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ' येत्या निवडणुकी व अस्पृश्य समाजाचे कर्तव्य ' या विषयी मननीय व उद्बोधक भाषण झाले. आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब
म्हणाले,
लौकरच होणाऱ्या प्रांतीय निवडणुकी अत्यंत महत्त्वाच्या आहेत कारण यावेळी जे निवडून येतील त्यांच्या हातात हिंदुस्थानची भावी राज्यघटना बनविण्याचा अधिकार जाणार आहे. त्यासाठी अस्पृश्य समाजाने या निवडणुकीत फार जागरूक राहिले पाहिजे. कुणाच्या व कसल्याही प्रचाराला व आमिषांना बळी न पडता आपले खरोखरीचे हित पाहतील असेच प्रतिनिधी निवडून देणे हे अस्पृश्यांचे आजचे कर्तव्य आहे. ब्रिटिश हिंदुस्थानात आपला समाज ६ कोटीवर असून गेली दोन हजार वर्षे इतरांनी आपणास सर्व प्रकारे वाईट अवस्थेत ठेवलेले आहे. शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन ही आपली एकमेव संस्थाच आपणास या गर्तेतून वर काढू शकेल. ' काँग्रेस म्हणजे स्वराज्य ' या फसव्या घोषणांनी भुलून जाऊ नका. स्वराज्य असले तरी त्यात आम्हा अस्पृश्यांना किती भाग मिळेल हाच मुख्य प्रश्न आहे.
जनता : २९ डिसेंबर १९४५.