३०-५-१९३७ केवळ निवडणुकीत विजय मिळाल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका - Page 64

२६ ` डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

एकटा स्वतंत्र मजूर पक्षच होय. आमच्या पक्षाजवळ पैसा नव्हता, संघटना नव्हती. केवळ स्वतःच्या चिकाटीने प्रचार कार्याच्या बळावरच आमची १४ माणसे निवडून येऊ शकली आणि काँग्रेससारख्या बलवान पक्षाशी दोन हात करून, विजय मिळवून अधिकाराने अभिनंदन समारंभ साजरा करण्याचा हक्क आमच्या पक्षाला प्राप्त झाला आहे. निवडणुकीत इतर पक्षांची जी दैना झाली आहे, तिच्याशी तुलना करता स्वतंत्र मजूर पक्षाने मिळविलेला विजय अपूर्व होय, ही गोष्ट आमच्या शत्रुंनाही कबूल करावी लागेल.

आपल्या इलाख्याप्रमाणे इतर प्रांतांच्या असेंब्लीतही अस्पृश्य वर्गाला जागा राखून ठेवलेल्या आहेत. परंतु मुंबई व्यतिरिक्त इतर प्रांतात काँग्रेसने अस्पृश्यवर्गीय उमेदवारांच्या निवडणुकीत अक्षमा' ढवळाढवळ केली. मुंबई प्रांतात मात्र आम्ही आमचा लढा वीरवृत्तीने लढविला. कुस्तीकरता एकदा दंड ठोकून उभे राहिल्यावर ज्याला जो डाव साधेल त्याने तो करून विजय मिळवावा यात काही वावगे नाही. तथापि, महाभारतात सांगितले आहे की, धर्मयुद्ध करून नीतीने मिळविलेल्या विजयाची थोरवी आणि आनंद श्रेष्ठ प्रतीचा असतो. दुर्दैवाने गेल्या निवडणुकीच्या युद्धात काँग्रेसने धर्मनीती ठेवलेली नव्हती. ठळक उदाहरणे द्यावयाची झाल्यास अनेक आहेत. मी फक्त एकाच उदाहरणाचा येथे उल्लेख करणार आहे. अलाहाबाद येथे काँग्रेसच्या अधिपतीच्या प्रांतात त्याच सर्वाधिकारी म्हणविणाऱ्या व्यक्तिकडून गेल्या निवडणुकीत घडलेले आचरण अगदी हीन वृत्तीचे नव्हते, असे कोण म्हणेल ? अलाहाबाद शहरात अस्पृश्य समाजाकरिता एक जागा राखून ठेवण्यात आली आहे. या जागेकरिता दोन उमेदवार उभे होते. त्यात अस्पृश्य समाजासाठी ज्याने कित्येक वर्षे तन-मन-धनाने कार्य केले असा एक लायक, अनुभवी आणि जुना पुढारी उभा होता. त्याच्याविरुद्ध काँग्रेसचे पंचप्राण म्हणविणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपला हरी नावाचा एक सांगकाम्या नोकर उभा केला. अस्पृश्य पुढाऱ्याच्या आजपर्यंतच्या समाज सेवेच्या तुलनेने पाहता या हरी पाणक्याची पात्रता किती असेल हे न सांगताही समजण्यासारखे आहे. काँग्रेसच्या पुढाऱ्यांना अस्पृश्यांच्या पुढाऱ्यांपेक्षा हरीची कर्तबगारी श्रेष्ठ प्रतीची वाटली. परंतु आपल्याला असल्या गोष्टीची पर्वा बाळगण्याची जरूर नाही. युद्धाला एकदा उभे राहिल्यावर रडत-राऊताची वृत्ती स्वीकारण्यात काहीच अर्थ नाही. सुरत येथे डॉ. सोळंकीच्या उमेदवारीच्या वेळी तीच गोष्ट केली. काँग्रेसने डॉ. सोळंकी यांच्याविरुद्ध एका चपराशाला उभे केले होते. या सर्व गोष्टींचा विचार करता गेल्या निवडणुकीत आपला जो विजय झाला तो सामान्य प्रतीचा खास नव्हे. मगराच्या मगर-मिठीतून आणलेला हा एक दिव्य मणी आहे. अर्थातच आपण आज जो विजय मिळविला तो अखेरचा विजय नव्हे. केवळ निवडणुकीत