३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाइट - Page 70

३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

म्हणेल ? कारण डॉक्टरसाहेब कोणत्याही कार्यक्रमाकरिता या भागात आले नव्हते. ते फक्त आपल्या कोर्टाच्या कामासाठी जात असतानासुद्धा लोकांना त्यांच्या दर्शनसुखाची इतकी आतुरता वाटावी हे अलौकिकत्वाचे लक्षण म्हणावयास कोणतीच हरकत नाही.

विशेषतः हा दिवस बाजाराचा असूनही लोकांनी आपली खरेदीविक्री चटकन आटपून ते बायकामुलांसह चाळीसगाव स्टेशनवर आले होते. तसेच डाँक्टर- साहेबांच्या आगमनासंबंधी हँडबिले वगैरे काहीच काढली नव्हती. नुसत्या'ऐकिव बातमीने हा सारा अफाट जनसमुदाय त्यांच्या दर्शनासाठी येथे जमला होता हे विशेष होय !

यानंतर डॉ. आंबेडकरसाहेब सर्वांचा प्रेमभराने निरोप घेऊन सकाळच्या ६-४५ च्या गाडीने धुळ्यास गेले. त्यांच्याबरोबर मे. डी. जी. जाधव व दत्तात्रय मागाडे हे उत्साही तरुण समाजकार्यकर्तेही होते. रात्रौ बोर्डिंगला डॉ. आंबेडकर भेट देणार हे ऐकून तेथे दिवाबत्ती रोषणाई वगैरेची तयारी सुरू होती. डॉ. बाबासाहेबांच्या आगमनाची वाट पाहण्याकरिता बोर्डिंगपासून ते स्टेशनपर्यंत दोन फर्लागावर लोक ठिकठिकाणी दुतर्फा उभे होते. लोकांची शिस्त ठेविण्याकरिता पहिलवान धावजी यांनी आपल्या आखाड्यासह एकंदर व्यवस्था ठेविली होती. तसेच डॉ. आंबेडकरसाहेबांना स्टेशनवरून आणण्याकरिता श्री. हरिभाऊ पाटसकर, वकील यांची पत्नी सौ. वारूबाई पाटसकर यांनी आपल्याकडील मोटारगाडी पाठवून दिली होती. श्री. पाटसकर कुठे बाहेरगावी गेल्यामुळे ते यावेळी डॉक्टरसाहेबांना भेटू शकले नाहीत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ता. ३१ जुले १९३७ शनिवार रोजी सकाळचे गाडीने कोर्टाचे कामासाठी धुळे येथे निश्‍चित येणार आहेत, असे मि. पाटील वकील यांचेकडून समजताच समतावादी दलित मंडळाच्या कार्यकारी मंडळींनी अगोदरच कडेकोट तयारी केली होती. त्याप्रमाणे ता. ३१-७-१९३७ रोजी ७०-८० स्काऊटसह हजारो अस्पृश्य बंधुभगिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हार्दिक स्वागत करण्यासाठी मोठ्या पहाटेस उत्सुकतेने धुळे स्टेशनवर हजर होते. धुळे स्टेशन स्त्री, पुरुष व मुलांनी फुलून ते डॉ. आंबेडकरांचा सारखा जयघोष करीत व सामाजिक पदे गात उभे होते. स्वागतास श्री. ए. आर. सावंत, पुनाजीराव लळिगकर, तुकारामजी पहिलवान, श्री. ढेंगे, जी. एस. अहिरे, आर. बी. अहिरे, सुकदेव पहिलवान, धोंडिराम पहिलवान, सखाराम पहिलवान, देवरामपंत अहिरे वगैरे मंडळी प्रामुख्याने हजर होती.

गाडी बरोबर ८-२० वाजता धुळे स्टेशनवर आली. डॉक्टरसाहेब हास्यवदन करीत श्री. डी. जी. जाधव, एम. एल. ए. यांचेसह गाडीतून उतरताच, ' आंबेडकर कौन है। दलितोंका राजा है।' ' आंबेडकर झिंदाबाद ' असा