३१-७-१९३७ साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाइट - Page 72

३४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दिवाणपद घेतले तर मात्र ते स्वराज्य नव्हे, हे म्हणणे योग्य आहे काय ? भावना व तत्त्वज्ञान क्षणभर बाजूला ठेवून व्यवहारी दृष्टीने विचार केला तर असे दिसून येईल की गळे कापणारे सावकार, मजुरांना नाडणारे गिरण्यांचे मालक व आपल्याला अन्य तऱ्हेने गांजणारे लोक जसे होते तसेच या देशात राहणार आहेत. जमीनदार लोक, पाटील लोक हे सर्व तसेच राहणार. इंग्रज लोक निघून गेले तरी हे लोक कायम राहणार आहेत. म्हणून पूर्वपिक्षाही आपणाला जास्त चिता बाळगली पाहिजे. इतके दिवस एक गोष्ट आम्हाला पोषक होती. ती अशी की, इंग्रज मनुष्य जातीविषयक भावना व स्पृश्यास्पुश्य विचार पाहात नव्हता. यापुढे तुम्हाला गांजणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता गेली आहे. आता आपल्या लोकांची दाद घेणार तरी कोण ? हे स्वराज्य नसून इतर लोकांचे आमच्यावर राज्य होणार आहे. म्हणून संघटना करणे हे तुमचे कर्तव्य आहे. संघटना न केल्यास तुमची दैना शतपट होईल. आज महारांवर जुलूम झाला तर पाटील, शिपाई, मामलेदार कोणी त्याला मदत करीत नाही. इतकेच नव्हे तर एक महारही दुसऱ्या महाराला मदत करीत नाही. म्हणून जातीय संघटन अवश्य करा. अन्यायाच्या वेळी तरी त्याला मदत करा. पैशाशिवाय काही-काम होत नाही. वकील, साक्षीदार, कोर्टाची प्रोसेस, मोटारचे भाडे या सर्व गोष्टींना पैसा लागतो. सबब न्याय मिळविण्यासाठी जातीचा फंड उभारा.

एका गावात प्रयत्न करून तुम्ही न्याय मिळविला तर त्याची दहशत इतर गावावर पडेल. तुमचे काम दुसऱ्याने करावे, अशी अपेक्षा का करता ? तुमच्यासाठी श्री. बर्वे यांनी छात्रालय काढावे किंवा गांधींनी काढावे असे का ? महाराष्ट्रात दहा लाख महार अस्पृश्य लोक आहेत. प्रत्येकाने एक रुपया दिला तर दहा लाखाचा फंड जमा होईल.

इंग्रज आता काही करू शकत नाही. याचे मी उदाहरण देतो. मंत्रीमंडळात होता होईल तो अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधी घ्यावेत, असे बादशहाने गव्हर्नरला दिलेल्या आज्ञापत्रिकेत म्हटले आहे. हल्लीचे मंत्रीमंडळ गांधींच्या सांगण्यावरून तयार झाले. मुंबईच्या मंत्रीमंडळात महार-मांगांचा एकही प्रतिनिधी नाही तरी पण गव्हर्नराने त्यात हात घातला नाही.

मी काँग्रेसला का मिळालो नाही, असा प्रश्‍न काही लोक विचारतात. त्याची कारणे अशी आहेत :--

(१) काँग्रेसच्या राजकारणात जर काही निष्पन्न झाले असेल तर ब्राह्मण्याचा उदय झाला एवढेच मला दिसते. सहा प्रांतात कोण लोक दिवाण झाले ते पाहा. ब्राह्मण मुख्य प्रधान झाले आहेत. साम्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट आहे.