साप्राज्यशाहीपेक्षा ब्राह्मण्य हजारोपट वाईट ३५
(२) मी अस्पृश्यांकरता जी चळवळ करतो ती बंद करा, असे मला सांगण्यात
येते; परंतु मला पगाराची मातब्बरी नाही किंवा मान मिळविण्याचीही मला पर्वा
नाही. तुम्ही लोकांनी स्वाभिमानी बनावे हीच माझी आकांक्षा आहे व त्याकरता
स्वतंत्र चळवळ करणे मला अवश्य आहे. तुमच्यात व माझ्यात फरक एवढाच
की तुमच्यापेक्षा मला जास्त ज्ञान आहे. म्हणून मी जास्त पाहू शकतो व धोका
कोठे आहे, हे मला समजते. काँग्रेसच्या लोकांनी काहीही म्हटले तरी मला
त्याची पर्वा नाही. तुम्ही माणसे झालात म्हणजे माझे श्रम सफल झाले. हे ' स्वराज्य धोकादायक आहे. ज्यांच्या हाती सामाजिक सत्ता होती त्यांच्याच हाती
राजकीय सत्ताही गेली आहे. तरी आता दरएक गावाने दहा रुपये तरी फंडाला
द्यावे. म्हणजे तुम्हा लोकांना न्याय मिळविता येईल. आपल्या स्वतंत्र मजूर
पक्षाची पंधरा माणसे मुंबईच्या असेंब्लीत आहेत. ही माणसे एका दावणीत पक्की
बांधलेली आहेत. एकाचे तोंड एकीकडे व दुसऱ्याचे दुसरीकडे असे
नाही. यामुळे कॉँग्रेस पक्षाला कोणाची भीती वाटत असेल तर ती आमच्या
पक्षाची आहे. काँग्रेस पक्षाला मुसलमानांची भीती वाटत नाही किंवा लोकशाही
पक्षाची भीती वाटत नाही. ही गोष्ट वल्लभभाई यांनी पुणे येथे जे भाषण केले
त्यात उघड झाली. आपण निवडणुकीच्या वेळी संघटनेने वागलो म्हणून हे
फळ मिळाले. निवडणुकीच्यावेळी जी शपथ घेतली ती कायम ठेवा. आपल्या
संस्थेची शाखा प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केली पाहिजे. वरून मदत करणारा
दाता कोणी नाही, जो कष्ट करील त्याची सत्ता असते. प्रत्येक संस्थेत आपली
जास्त माणसे जातील, अशी एकजुटीने खटपट करा. काँग्रेसला हरिजनांची दया असती तर कोणतीही शर्त न घालता एखादा हरिजन त्यांनी मंत्रीमंडळात घेतला नसता काय ? पण यासाठी आपण कोणाजवळ भिक्षा मागू नये. मी काँग्रेसच्या मंडळीशी कधी मसलत केली नाही. सव्वा मेल दूर राहिलो.
खानदेशात आपल्या पक्षाचे श्री. दौलत गुलाजी जाधव हे निवडून आलेले आहेत, त्यांच्याकडून काम करवून घ्या. या देशात आपणाला माणुसकीने वागवीत नाहीत, ही गोष्ट तुम्ही विसरता, परंतु मी कधीच विसरू शकत नाही. सतत जागृत राहा म्हणजे यश मिळेल
याप्रमाणे डॉक्टरसाहेबांचे व्याख्यान झाले. व्याख्यान झाल्याबरोबर डॉक्टरसाहेबांना सौ. नर्मदाबाई वाघ, लळींगकर, दशरथ धांकू वाघ, जुने धुळे व इतर तालुक्यातील लोकांनी हार अर्पण केले व सभा विसजित झाली.
या पश्चिम खानदेश जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब सामाजिक कार्यासाठी कधीही आले नव्हते व इतर जिल्हयातील अस्पृश्य पुढाऱ्यांनी केव्हाही चालना दिली नाही. परंतु डॉ. बाबासाहेबांची विद्वता व अपूर्व कामगिरी पाहून स्वाभिमानी अस्पृश्य जनता खडबडून जागी झाली यात संशय नाही.