१४-८-१९३७ तुम्ही संघटन करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा - Page 76

१०४

तुम्ही संघटन करून [स्वतंत्र ] [मजूर ] [पक्षाला ]
बलवान करा

(डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे भाषण दि. १४ ऑगस्ट १९३७ च्या जनतेच्या अंकात अग्रलेखाच्या जागी दिलेले आहे. भाषण कोठे व केव्हा झाले याचा उल्लेख नाही.- संपादक)

प्रिय बंधुंनो,

आपल्या या सभेस हजर राहण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. स्वतंत्र मजूर पक्षाला व्यवस्थित स्वरूप देण्याचा व आपल्या लोकात संघटना घडवून आणण्याचा हा जो उपक्रम तुम्ही सुरू केला आहे तो स्तुत्य व अत्यंत महत्त्वाचा आहे.

सहा महिन्यांपूर्वी होऊन गेलेल्या असेंब्ली इलेक्शनचे आपण सिंहावलोकन केल्यास त्यावेळी आपल्या लोकांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल मला धन्यता वाटते. कारण अत्यंत प्रभावशाली व श्रीमंत अशा काँग्रेसशी आपणास त्यावेळी स्पर्धा करावयाची होती. स्वतंत्र मजूर पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ द्यावयाचा नाही, असा काँग्रेसने पण केला होता. आपल्या उमेदवारास पाडण्यासाठी काँग्रेसने आटोकाट प्रयत्न केला होता. अशा बिकट परिस्थितीला तोंड देण्याचे काम मला करावे लागले. इतर प्रांतांकडे आपण पाहिल्यास सर्वांनी काँग्रेसला शरणचिठ्ठी दिल्याचे आपणास दिसून येईल. सबंध | हिंदुस्थानात काँग्रेसबरोबर लढा करण्यास काय तो मी एकटाच उभा होतो व त्यात मी यशस्वीही झालो. मात्र ही गोष्ट केव्हाही खरी आहे की तुम्हा लोकांच्या पाठिंब्याशिवाय मला यश येणे शक्य नव्हते. तुम्हाला माहीतच आहे की त्यावेळी आपल्यातीलच काही माणसे काँग्रेसला बळी पडली होती. परंतु असे असतानासुद्धा त्यावेळी आपण मोठे यश संपादन केले, ही गोष्ट काँग्रेसचे पुरस्कर्ते देखील कबूल करतात. त्यावेळी सबंध हिंदुस्थानात काँग्रेसला तीनच जागा महत्त्वाच्या वाटत होत्या. त्या म्हणजे डॉ. वाड़ांची मुंबई युनिव्हर्सिटीची जागा, लोकशाही स्वराज्य पक्षाचे अध्वर्यू श्री. लक्ष्मण बळवंत भोपटकर यांची पुण्यातील जागा आणि तिसरी स्वतंत्र मजूर पक्षाची माझी मुंबईची जागा. यापैकी पहिल्या दोन जागा काँग्रेसला मिळविता आल्या. मात्र तिसरी आपली जागा त्यांना घेता आली नाही. यामुळे काँग्रेसच्या लोकांनासुद्धा आपल्या

जनता : १४ आगस्ट १९३७.