१४-८-१९३७ तुम्ही संघटन करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा - Page 78

४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काँग्रेसने या नालायक माणसांना निवडून आणले यात काँग्रेसने चूक केली, असे म्हणावयास काय हरकत आहे ? मुसलमानांचा प्रतिनिधी घेण्यासाठी जर त्यांनी इतकी यातायात केली तर त्यांनी अस्पृश्यांचा प्रतिनिधी का घेतला नाही ? तर याला एकच गोष्ट कारण आहे ती ही की ' आम्ही तुमच्याकरता सर्व काही करू. तुम्हाला स्वतःला तुमच्याकरिता काही करण्याची जरूर नाही ' अशी त्यांची वृत्ती आहे.

थोड्या दिवसांपूर्वी एका चांभार पुढाऱ्याने वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले होते की

' अस्पृश्यांचा प्रतिनिधी मंत्रीमंडळात घेतला नाही याबद्दल आम्हाला वाईट वाटत नाही. कारण आमचा खेर साहेबांवर पूर्ण विशवास आहे. ' असे जर आहे तर मग या लोकांनी निवडणूक लढविण्याची एवढी यातायात का केली? अशा. रीतीने जर या लोकांवर विश्वासून राहाल तर तुम्ही खास बुडाल, हे लक्षात ठेवा.

महात्मा गांधी हे काँग्रेसचे चार आणेवाले सभासदसुद्धा नाहीत परंतु त्यांचा सर्व फतवा काँग्रेसचे सर्व लोक मानतात. मग त्यांनी या बाबतीत काही का करू नये ? परंतु त्यांना आपल्याबद्दल काही करावयाचे नाही, हेच यावरून दिसते. म्हणूनच आपण संघटित होण्याची जरूर आहे. मला दुसरीही एक गोष्ट तुम्हाला सांगावयाची आहे ती ही की कौन्सिलमध्ये जाणे हे काही सोपे नाही. त्यासाठी प्रपंच सोडावा लागतो. इलेक्शनचा खर्च जबरदस्त होतो. तो करणे आपल्यातील उमेदवारांना शक्य नसते. मला सांगितले पाहिजे की मागच्या इलेक्शनच्या वेळेस उभे राहिलेल्या बऱ्याच उमेदवारास मला पैशाची मदत करावी लागली तेव्हा ते निवडून आले परंतु प्रत्येक वेळेस अशी मदत करणे मला शक्य नाही व उमेदवारांनाही त्यांचा त्यांना खर्च भागविणे शक्य नाही. म्हणून तुम्हाला तुमच्यातर्फ चांगली माणसे कौन्सिलमध्ये पाठवावयाची असतील तर त्यांचा खर्च तुम्ही दिला पाहिजे. मागच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसतफे जे उमेदवार उभे होते त्यांचा खर्च काँग्रेसनेच केला होता. एकट्या मुंबई शहरात ड्लेक्शनचे दिवशी काँग्रेसने हजारो रुपये खर्च केला होता, ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे.

मला तुम्हाला एवढेच सांगायचे आहे की या संस्थेला तुम्ही चांगल्यातऱ्हेने पाठबळ द्या व तिला काँग्रेससारखी प्रबळ बनवा. मुंबईमध्ये आपली लोकसंख्या एक लक्षाच्या वर आहे. तेव्हा निदान एक लाख लोक तरी या संस्थेचे सभासद बनवा.

या संस्थेची वार्षिक वर्गणी आठ आणे ठेवलेली आहे, ती फार कमी आहे तेव्हा ती भरण्यास प्रत्येकास काही हरकत नाही. कॉँग्रेसच्या पाठीमागे जसे श्रीमंत लोक आहेत तसे तुमच्या पाठीमागे कोणी नाही. तुमचा संसार तुम्हीच केला पाहिजे. विलायतेतही पार्लमेन्टात मजूर पक्ष आहे. परंतु ते सुद्धा अशी वर्गणी जमा करून इलेक्शने लढवितात.