तुम्ही संघटन करून . . . . पक्षाला वलवान करा ४१
कोणत्याही पक्षाला वर्तमानपत्राची फार जरूरी असते. वर्तमानपत्राशिवाय
आपणास कार्य करता येणार नाही. म्हणून आपल्या पक्षाचे जनतापत्र चांगल्या
तऱ्हेने चालले पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्याचे वर्गणीदार झाले पाहिजे. कौन्सिलमध्ये
तुम्ही पाठविलेले लोक तुमच्यासाठी काय करतात ते समजावून घ्यावयाचे झाल्यास
तुम्हाला ते जनता पत्रावरूनच समजेल. याकरिता तुम्ही सर्वांनी जनता
पत्राचे वर्गणीदार जरूर झाले पाहिजे. काही लोक इतर पत्रे घेऊन
वाचतात. का ? तर त्यात सऱ्ट्याचे नंबर व भविष्ये दिलेली असतात. सट्टा
खेळून कोणाचेही बरे झाले नाही. शिवाय वर्तमानपत्रात वर्तविलेली भविष्ये खरी
ठरत नाहीत. आपल्या पत्राशिवाय आपल्या पक्षाचे अधिकृत कार्यक्रम व
चळवळीची खरी दिशा इतर वर्तमानपत्रात वाचावयास मिळणार नाही. यासाठी
आणि आपल्या पक्षाचा अभिमान बाळगण्यासाठी सर्वांनी जनता [पत्राचे ] [वर्गणीदार ]
झाले पाहिजे
शेवटी तुम्हाला मला एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे ती ही की
तुम्ही तुमच्यात असलेली मानापानाची वाईट भावना काढून टाकली पाहिजे. माझे
नाव आले नाही तर मी पुढे आलेल्या कार्याला विरोध करीन ही भावना अत्यंत
वाईट आहे. तुम्ही काम करा की नाव तुमच्या पाठीस लागेल. मला व माझ्या
सहकारी मित्रांना माहीत आहे की जोपर्यंत आम्ही काही कार्य करून दाखविले
नव्हते तोपर्यंत टाइम्ससारख्या पत्रात थोडासा मजकूर छापण्यासाठी आम्हास
कितीतरी मनधरणी करावी लागत होती, परंतु आता तेच लोक ' तुमचा काही
मजकूर आहे काय? असल्यास पाठवा ' असे म्हणत आमच्या पाठीमागे
लागतात. सर्व लोकांनी राजकारणातील व समाजकारणातील भांडणे तत्काळ
विसरून गेले पाहिजे. मागे होऊन गेलेल्या महार परिषदेच्या वेळेस मला असे
दिसून आले की ज्यांच्या हातात त्या परिषदेची अधिकारसूत्रे मिळाली होती
त्यापैकी काही लोकांनी त्या अधिकाराचा आपापसातील भांडणासाठी दुरुपयोग केला, असे होता कामा नये.
या संस्थेचे मुख्य काम इलेक्शनच्या वेळी एकमताने वागणे हेच राहील. या संस्थेने ` उभे केलेल्या उमेदवारासच तुम्ही सर्वांनी मते दिली पाहिजेत. यासाठीच तुम्ही संघटना केली पाहिजे व ती इतकी मजबूत केली पाहिजे की आपल्यापैकी एकही माणूस फुटून जाता कामा नये. असे करण्याशिवाय आता आपणास गत्यंतर नाही. मागच्या इलेक्शनच्या वेळी माझ्या इ पी. बाळूच्या मतात फारतर हजार दोन हजार मताचेच अंतर होते. त्यावेळी तुम्हापैकी काही लोकांनी कुचराई केली असती तर इलेक्शनमध्ये माझी धडगत नव्हती. तुमच्या उन्नतीची सर्व भिस्त राजकारणावरच आहे. म्हणून तुम्ही संघटना करून स्वतंत्र मजूर पक्षाला बलवान करा, एवढेच मला तुम्हाला
सांगावयाचे आहे.
७ ७ ७