२८-८-१९३७ अशा देवांना काय पुजावे ? - Page 85

अशा देवांना काय पूजावे ? ४७

तिसरी गोष्ट दत्तात्रेयाची. अत्री ऋषीची बायको अनसूया ही महान पतिव्रता आहे, असे ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवांच्या बायकांना नारद सांगत गेला. आपल्यापेक्षा कोणी स्त्री अधिक पतिव्रता असावी हे त्यांना पाहावेना. तेव्हा या तिन्ही बायकांनी आपापल्या नवऱ्यांना अनसूयेचे पातिव्रत्य हरण करण्यास सांगितले व बायकांचे म्हणणे ऐकून हे तिघे वीरही त्या कामास तयार झाले. हे तिघेजण अनसूयाच्या घरी गेले. तिच्या नवऱ्याला काही कारण सांगून दुसरीकडे पाठविले व आपण अनसूयेच्या सहवासात राहू लागले. या अवस्थेत तिने एका मुलाला जन्म दिला आणि या बालकाचे जनकत्व कोणाकडे हा विचार पडल्यामुळे त्या तिघांवर सारखीच जबाबदारी टाकण्याकरिता त्याला तीन तोंडे लावली व तोच हा दत्तात्रेयाचा अवतार ! पुष्कळ लोकांचा असा समज झाला आहे की धर्मांतराची लाट आता थंडावली आहे. परंतु तसे नाही. धर्मातर हे होणारच आहे. ही चळवळ मी सोडली नाही, हे तुम्ही पक्के लक्षात ठेवा. पुष्कळ हिंदू लोक मला म्हणतात की, ' तुमच्या धर्मांतराच्या प्रश्‍नाने आमचे डोळे उघडले आहेत. आम्ही आता सावध झालो असल्यामुळे तुमच्या बाबतीतल्या कर्तव्यात आता आम्ही चुकणार नाही म्हणून तुम्ही धर्मांतराची चळवळ परत घ्या. ' परंतु आतापर्यंत मी जे बोललो त्या कारणासाठीच मला चळवळ परत घ्यावयाची नाही. तुम्ही पूर्ण विचार करा. दुसरा धर्म स्वीकारावयाचा तो पूर्ण तावून सुलाखूनच स्वीकारला पाहिजे. मला आशा आहे की यापुढे महार जातीतील सर्व लोक महार परिषदेने केलेल्या ठरावाप्रमाणेच वागतील.

डॉ. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर आभार प्रदर्शन, हारतुरे होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकारात सभा संपली.

७ ७ ७