६-११-१९३७ बहुजन समाजावर अन्याय होणार नाही असे कायदे करवून घेतले पाहिजेत - Page 90

५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

त्याची रक्‍त शोषक वृत्ती नाहीशी होणार नाही. त्याची भरमसाट व्याज घेण्याची आसुरी वासना नष्ट होणार नाही. त्यांची गोरगरिबांच्या घरादारावर निखारे ठेवण्याची बुद्धी नाहीशी होणार नाही.

आपल्या मुंबई इलाख्यातील ब्राह्मणेतर पक्ष गरिबांसाठी काही कार्य करील, असे वाटत होते. इतकेच नव्हे तर त्याचा काही काळ अभिमान वाटत होता. परंतु शेवटी शिस्तीच्या व संघटनेच्या अभावी आणि वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याच्या वृत्तीमुळे या पक्षाचे सारे बळ लयास गेले आहे आणि उच्च म्हणविणाऱ्या ब्राह्मण समाजाचे चढेल धोरण नेस्तनाबूद करण्याचा त्यांचा हेतू कोठल्या कोठे लयास गेला आहे. एका प्रबळ अशा पक्षाची ही आजची शोचनीय अवस्था आपण लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक माणसाने पक्षाशी पूर्ण इमानी राहिले पाहिजे. त्याने पुढाऱ्याची आज्ञा शिरसावंद्य मानली पाहिजे. पक्षाच्या कार्यक्रमावर नितांत विश्वास ठेवून प्रतारणा न करता अंमलात आणण्याचा जोमाने प्रयत्न केला पाहिजे. त्याने वैयक्तिक स्वार्थ सोडला पाहिजे. पक्षासाठी हाल, कष्ट सोसले पाहिजे व शिस्तीने सारे कार्य करणे हे ध्येय बाळगले पाहिजे. म्हणून स्वतंत्र मजूर पक्षात सामील होणारांनी या सर्व गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे.

आज असेंब्लीमध्ये आपल्या पक्षाचे प्रतिनिधी थोडे असले तरी असेंब्ली-

मधील दुसऱ्या पक्षांना त्याची भीती वाटते. याचे कारण आपण लोककल्याणासाठी जो कार्यक्रम आखला आहे तो पूर्णपणे पार पाडण्याचा आपण आटोकाट प्रयत्न करू याची त्यांना खात्री आहे. बहुजन समाजाला सुख मिळेल, त्यांच्यावर अन्याय होणार नाही असे कायदे सत्ताधारी पक्षाकडून करवून घेतले पाहिजेत. आपणास जे थोडे राजकीय हक्क मिळाले आहेत त्यात तूर्त समाधान मानून अधिकारासाठी झगडले पाहिजे. फौजदार, मामलेदार, सर्कल इन्स्पेक्टर, तलाठी व पाटील यांचे हाती सत्ता नाही. महार ज्याप्रमाणे सरकारी नोकर त्याचप्रमाणे ते नोकर आहेत. खरी राजसत्ता लोकांचे हाती म्हणजे कौन्सिलच्या हाती आहे. म्हणून तुम्हास सरकारी नोकरांना भिण्याचे कारण नाही. त्यांनी व इतरांनी तुम्हास त्रास दिल्यास त्याची दाद लावण्यासाठी, तुमची गाऱ्हाणी, दुःखे व जुलूम वेशीवर टांगून, स्वतंत्र मजूर पक्ष ती नाहीशी करण्याचा प्रयत्न करील, असे आश्‍वासन मी तुम्हास देतो. स्वतंत्र मजूर पक्षाच्या जिल्हानिहाय शाखा स्थापन होणार आहेत. माझे बालपण व प्राथमिक शिक्षण या जिल्हयाला झाल्यामुळे या जिल्हयाची शाखा स्थापन करताना मला अत्यंत आनंद होत आहे.