७-११-१९३७ मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमान- शून्य होणार काय ? - Page 91

१०८

मनुष्य असूनही भाकरीसाठी
स्वाभिमानशून्य होणार काय ?

मु. दौंड, जि. पुणे येथे तारीख ७ नोव्हेंबर १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरली होती. पुणे जिल्ह्यात हा भाग विशेष मागासलेला आहे आणि यासाठीच डॉ. आंबेडकरसाहेबांनी या ठिकाणी जाऊन तेथे एकंदर परिस्थिती पाहिली. त्यांच्या आगमन प्रसंगी सौ. ठकूबाई रोकडे, भीमाबाई मचार, चिमाबाई सोनवणे, गोधाबाई, भागीरथीबाई रोकडे, लक्ष्मीबाई डिखळे व जयाबाई भिंगारदिवे वगैरे स्त्रियांनी त्यांना पंचारती ओवाळून त्यांचे स्वागत केले व नंतर सभेस सुरवात झाली. प्रथम आमदार राजाराम भोळे यांनी सर्वाचे स्वागत करून डॉ. आंबेडकरांना अध्यक्षस्थान स्वीकारावयास सांगितले. त्यांच्यानंतर आमदार डॉ. भाऊसाहेब गडकरी यांचे पाठिंब्यादाखल भाषण झाले.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलावयास उठले. ते आपल्या भाषणात

म्हणाले,

प्रिय भगिनींनो व बंधुंनो,

येथे येऊन फारसे बोलावे लागेल, असे मला वाटले नव्हते. तुम्हा मंडळीची भेट घेतल्याने कार्यभाग संपला असे वाटत होते. परंतु तुमच्या येथील परिस्थिती ` पाहून मला दोन शब्द बोलणे भाग पडत आहे. आजच्या सभेचा मुख्य उद्देश म्हणजे स्वतंत्र मजूर पक्षाची शाखा काढणे हा आहे. हा आमचा पक्ष फक्त अस्पृश्य वर्गाकरिता नसून जे लोक मजूरी करून पोट भरतात व शेतकरी वर्ग आहे अशांचा मुख्यत्वेकरून या पक्षात समावेश होतो. आपल्या पक्षाची स्थापना होऊन एक वर्षही झालेले नाही. परंतु त्याच्या कार्याचा विस्तार व्यापकतेने वाढत आहे. यावरून या पक्षाच्या आवश्यकतेची जाणीव होईल. श्रमजीवी वर्गाचे काँग्रेस मुळीच कल्याण करणार नाही. काँग्रेस ही माया आहे. या महामायेच्या पाशात सापडून आपला अधःपात करून घेऊ नका. तुम्हाला ठाऊक आहे की एखादा लांडगा जर मेंढीला म्हणाला की, ' चल मी तुला स्वर्गात नेतो ' पण तो तिला स्वर्गात घेऊन जाण्याऐवजी तिला मध्येच खाऊन खरा स्वर्ग दाखविल्याशिवाय राहाणार नाही. यासाठी आपण वेळीच

जनता : २० नोव्हेंबर १९३७. |