७-११-१९३७ मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमान- शून्य होणार काय ? - Page 92

पुष्ठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

सावध राहा. खरे खोटे कोणते ते स्वतःच्या बुद्धीने ठरवा. तुमचे खरे हित व्हावे, अशी जर तुमची इच्छा असेल तर आजच स्वतंत्र मजूर पक्षाचे सभासद व्हा. कायदेमंडळात आपले लोक अधिक प्रमाणात जाणे जरूरीचे आहे. तेच आपले प्रतिनिधी आपल्या हिताचे काम करतील.

तसेच वतनाच्या बाबतीत काँग्रेसचे लोक तुमचा गैरसमज करतील, खेडेगावात तुमची वस्ती थोडी असते. तुमची उपजीविका येथील स्पृश्यांच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यासाठी ते तुमची हडकी हाडवळे जातील म्हणून दिशाभूल करतील, त्यांच्यावर तुम्ही विशवास ठेवू नका. दिवाळीत महारणीने पाटलास ओवाळण्यास जावे आणि म्हणावे ' बळीचे राज्य येवो '. आतापर्यंत त्याने पुष्कळ राज्य भोगले आहे. मग पाटलाच्या बायकोने महारास का ओवाळू नये ? दसऱ्याच्या दिवशी महाराने आपटा आणावा व तो पाटलाने खुशाल लुटावा. अशावेळी पाटलाला आपटा आणावयास काय झाले ? पंचायती वगैरे महत्त्वाच्या कामासाठी सर्व लोकास बोलाविण्याकरिता महारास पाठविले जाते, पण पंचायतीमध्ये बसण्याचा अधिकार महारास का नसावा ? मयताचे निरोप पोष्टाने किवा तारेने पाठवावयाचे सोडून ते सारे महाराने पायपीट करून काय म्हणून कळवावे? मी आतापर्यंत फक्त दोन गोष्टी सांगितल्या आहेत. त्या म्हणजे (१) मृतमांस न खाणे, (२) उच्छिष्ट अन्न न खाणे. भाकरी वगैरे भीक मागून आणण्याच्या प्रकाराविरूद्ध मी आहे. अशामुळे आपण इतरांप्रमाणे मनुष्य असूनही भाकरीसाठी स्वाभिमानशून्य का व्हावे ?

अशा परिस्थितीत मी तुम्हास स्पृश्य लोकांकडे भाकरीसाठी भीक मागा, असे कसे सांगेन. मला येथे जमलेल्या स्त्रियांना सांगावयाचे आहे की तुम्ही मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांची योग्य निगा न करता, त्यांना इतर स्पुश्य समाजातील मुलाबाळांप्रमाणे वळण लावून त्याचे शिक्षणाकडे लक्ष न वेधविता गावातून भीक मागीत का फिरविता ? तुम्ही मनुष्य आहात. स्पृश्य समाजातील मुले शिकून आपला नावलौकिक काढतात त्याप्रमाणे आपल्या मुलांना का वळण देत नाही. माझ्या सांगण्याप्रमाणे जर येथले लोक वागायला लागले, असे कळले तरच मला आनंद होईल.

या सभेस पुण्याहून मे. सुभेदार घाटगे बंधु, मधाळे, अण्णा पोतनीस, डिखळे बंधू, बोराळे, पानसरे, गायकवाड, घोटके वगैरे बरीच मंडळी हजर होती. या सभेत (१) महार वतन बिलास पाठिंबा, (२) लोकल बोर्डाच्या विहिरी अस्पृश्यांच्या वस्तीजवळ बांधणे, (३) खोती पद्धती नष्ट करणाऱ्या बिलास

पाठिंबा, (४) मिलिटरी गोळीबारामुळे महार लोकांना होणारा त्रास दूर व्हावा किंवा त्याबद्दल त्यांना वेतन मिळावे वगैरे ठराव पास झाले. शेवटी हारतुरे वगैरे देण्याचा समारंभ झाल्यावर ही सभा बरखास्त करण्यात आली.