१०९
मी जे कमाविले ते अखिल अस्पृश्यांसाठी
रविवार तारीख ७ नोव्हेंबर १९३७ रोजी रात्रौ ८ वाजता पुण्यातील भवानी पेठ, भंगी वस्तीला अस्पृश्य समाजाचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली. सदर प्रसंगी आमदार भोळे, मे. खंडेराव सखाराम सावंत, मे. सुभेदार आर. एस्. घाटगे साहेब, मे. रेवजी दगडूजी डोळस, मे. के. गायकवाड, मे. एस्. थोरात, मे. शांताराम पोतनीस, मे. के. आर. मधाळे, मे. एस्. गायकवाड, वगैरे प्रमुख मंडळी व महार, मांग, भंगी वगैरे जनसमुदाय हजर होता. डॉ. बाबासाहेबांची मोटार येताच त्यांचे जयजयकारात स्वागत करण्यात आले. प्रथम भंगी समाजातील प्रसिद्ध गायनरत्न कासम इसूफ ज्ञानज्योत यांचे साथीदारांसह सुस्वर असे [संगीत ] गायन झाल्यावर भंगी समाजातील तरूण कार्यकर्ते मे. विठ्ठलदास अल्लीभाई चव्हाण यांनी भंगी समाजाच्या आर्थिक परिस्थितीविषयी व फलशींग संडास सिस्टिममुळे झालेल्या बेकारीची डॉ. बाबासाहेबांना माहिती दिल्यावर भंगी समाजातर्फे त्यांचे स्वागताप्रित्यर्थ पुष्पहार [अर्पण ] [केले. ] नंतर हरिजन हितचिंतक मंडळाकडून चालत असलेल्या मोफत [वाचनालयातर्फे ] [मंडळाचे ] [जॉईट ] [सेक्रेटरी ] मे. किसन तुकाराम भोसले [यांनी ] [मंडळ ] [व ] [वाचनालय ] [यांची ] [माहिती ] [सांगून ] वाचनालयातफे पुष्पहार अर्पण [केले. ]
नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमृततुल्य भाषणाच्या अमोल प्रसादाने जमलेल्या श्रोतूजनास तृप्त केले. ते म्हणाले,
मी जे कमाविले आहे ते केवळ महारांकरिता नसून अखिल अस्पृश्यांसाठी आहे. आम्ही जसे ब्राह्मणासंगती मिळून मिसळून वागण्यास पाहतो तसेच महारांनी भंगी, मांग यांच्यात मिसळून वागले पाहिजे, नाही तर मी महारांकरिता काही करणार नाही. तसेच भंगी समाज सांगेल ते मी करीन.
७ ७ ७
जनता : २० नोव्हेंबर १९३७..